माजी सभापती सुरेंद्र सिरसाट यांचे निधन

0
151

गोव्याचे माजी सभापती व ज्येष्ठ राजकीय नेते श्री. सुरेंद्र सिरसाट यांचे काल रात्री वयाच्या पंच्याहत्तरीत अल्प आजाराने निधन झाले. प्रकृती अत्यवस्थ झाल्याने त्यांना म्हापसा येथील एका खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले होते. तेथेच काल रात्री त्यांची प्राणज्योत मालवली.
महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे एकेकाळचे खंदे नेते म्हणून ओळखले जाणारे प्रा. सिरसाट पत्रकारितेतून राजकारणात आले होते. १९७७ साली ते म्हापशातून सर्वप्रथम गोवा विधानसभेवर निवडून गेले. त्यानंतर ८४, ८९ व ९४ असे ते पुन्हा विधानसभेवर निवडून गेले होते. १९९०-९१ दरम्यान सभापतीपदाची माळ त्यांच्या गळ्यात पडली होती.
गोव्यात भारतीय जनता पक्ष आणि महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष यांची युती झाली तेव्हा प्रा. सिरसाट मगो पक्षाचे अध्यक्ष होते. भाजप – मगो युतीमध्ये त्यांचा महत्त्वाचा वाटा राहिला होता. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जुझे फिलीप डिसोझा व मिकी पाशेको यांच्यातील संघर्षानंतर जुझे फिलीप यांनी प्रदेशाध्यक्षपद सोडताच राष्ट्रवादी कॉंग्रेस नेते शरद पवार यांनी सिरसाट यांची राष्ट्रवादी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षपदी निवड केली होती. अत्यंत मनमिळावू स्वभावाच्या श्री. सिरसाट यांचे सर्वच राजकीय पक्षांशी व नेत्यांशी प्रेमाचे संबंध होते. आपल्या सार्वजनिक जीवनाची सुरूवातही एक पत्रकार म्हणून केल्याने पत्रकारांशीही त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. आपल्या म्हापसा शहरावर त्यांनी नवप्रभेतून एक विस्तृत लेखमाला रविवारच्या पुरवणीत लिहिली होती. सिरसाट यांना अत्यवस्थ वाटू लागल्याने इस्पितळात दाखल करण्यात आले होते.

राजकारणाबरोबरच सार्वजनिक क्षेत्रातही सक्रिय होते प्रा. सिरसाट

श्री. सुरेंद्र वसंत सिरसाट यांचा जन्म १९ नोव्हेंबर १९४६ रोजी म्हापसा शहरातच झाला. एम. कॉम आणि डी. एच. ई चे शिक्षण घेतल्यानंतर सुरवातीच्या काळात त्यांनी पत्रकारिता केली. आसगावच्या ज्ञानप्रसारक मंडळाच्या ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड व्होकेशनल स्टडीजचे ते काही काळ प्राचार्य होते. एक नाट्यकलाकार म्हणूनही त्यांची ओळख होती. कथा, लघुकथाही त्यांनी लिहिल्या.

वाणिज्य विषयावरील तसेच सेक्रेटेरियल प्रॅक्टिस विषयावरील पाठ्यपुस्तकेही त्यांनी अकरावी आणि बारावी इयत्तांसाठी लिहिली होती. ते एक आकाशवाणी कलाकारही होते.
सिरसाट यांनी १९७७ साली महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षातर्फे राजकारणात प्रवेश केला. तत्पूर्वी ते म्हापसा नगरपालिकेचे नगरसेवक होते. १९८९ ते ९४ या काळात ते गोवा घटक राज्याच्या पहिल्या विधानसभेवर पुन्हा निवडून गेले. २६ एप्रिल १९९० रोजी त्यांची गोवा विधानसभेच्या सभापतीपदी निवड झाली. मार्च १९९१ पर्यंत ते सभापतीपदी होते. डिसेंबर ९४ मध्ये ते पुन्हा एकवार विधानसभेवर निवडून गेले.

अखिल गोमंतक वैश्य परिषदेचे उपाध्यक्ष, उच्च माध्यमिक प्राचार्य मंचाचे सचिव, म्हापसा हिंदु ग्रामस्थ सभा, वैश्य मंडळ, ज्ञानप्रसारक मंडळ आदी सामाजिक संस्थांशीही त्यांचा निकटचा संबंध राहिला. गोवा राज्य सहकारी बँकेचे ते काही काळ अध्यक्षही राहिले होते.