बाबुश मोन्सेर्रात यांचे पुत्र रोहित पणजीचे नवे महापौर

0
183

>> दोघांचीही बिनविरोध निवड

पणजीच्या महापौरपदी पणजीचे आमदार बाबुश मोन्सेर्रात यांचे पुत्र रोहित मोन्सेर्रात, तर उपमहापौरपदी वसंत आगशीकर यांची बिनविरोध निवड झालेली असून त्यासंबंधीची घोषणा निर्वाचन अधिकारी नारायण कवळेकर हे आज करणार आहेत.

वरील दोन्ही पदांसाठी काल उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात आले. अर्ज भरण्यासाठीची मुदत दुपारी ३ वाजेपर्यंत होती. या मुदतीत महापौरपदासाठी केवळ रोहित मोन्सेर्रात यांचा, तर उपमहापौरपदी वसंत आगशीकर यांचा अर्ज आल्याने वरील दोघांचीही बिनविरोध निवड झाली आहे. आज मंगळवारी त्यांच्या निवडीची घोषणा करण्याची औपचारिकता तेवढी शिल्लक राहिली आहे.
बाबुश मोन्सेर्रात यांच्यासह त्यांच्या घरातील तीन व्यक्ती वेगवेगळ्या राजकीय पदांवर पोचल्या आहेत. बाबुश मोन्सेर्रात हे पणजीचे आमदार असून त्यांच्या पत्नी जेनिफर ताळगावच्या आमदार व महसूलमंत्री आहेत, तर पणजी पालिकेच्या महापौरपदी पुत्र रोहित यांची आता वर्णी लागली आहे.