माजी खासदार किरीट सोमय्या यांना मुंबईत केले स्थानबद्ध

0
34

भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांना कोल्हापूर दौर्‍यावर निघण्याआधीच मुंबईत मुलुंड येथील निवासस्थानी स्थानबद्ध करण्यात आले. सोमय्या यांना कोल्हापूर जिल्हा प्रवेशास मनाई करण्यात आली असून नोटीस घेऊन पोलीस सोमय्या यांच्या घरी दाखल झाले. या कारवाईवर सोमय्या यांनी आक्षेप घेतला. तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांनीही कारवाईचा निषेध केला.

राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांच्यावर किरीट सोमय्या यांनी घोटाळ्याचा आरोप केला आहे. या अनुषंगाने ही कारवाई करण्यात आल्याचा आरोप सोमय्या यांनी केला. तसेच त्यांनी यावेळी पोलिसांना तुम्ही मला कोल्हापूरच्या वेशीवर अडवू शकता, इथे मुंबईत नाही, असे म्हणत मुंबईहून कोल्हापूरला जाणार्‍या महालक्ष्मी एक्स्प्रेस या रेल्वेत बसले व कोल्हापुरच्या दिशेने रवाना झाले. मात्र सोमय्या यांना मध्येच अडवले जाण्याची देखील शक्यता वर्तवली जात आहे.