राज्यात सर्दी व तापाची साथ

0
45

>> लहान मुलांसह प्रौढांनाही बाधा

राज्यात कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात असतानाच आता राज्यातील लहान मुलांसह प्रौढांमध्येही सर्दी व तापाची साथ पसरली असल्याचे दिसून येत आहे. हा बदल्या हवामानाचा परिणाम असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. तसेच कोविडचा ताप नसला तरी ताप येत असल्यामुळे कोविडची चाचणी करून घेण्यासाठी मात्र आरोग्य केंद्रांसमोर रांगा लागत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

राज्यातील शहरी भागांबरोबरच ग्रामीण भागांतही ‘वायरल फिव्हर’चे (विषाणूजन्य ताप) प्रमाण सध्या वाढलेले आहे. खास करून प्रतिकार शक्ती कमी असणार्‍या लहान मुलांमध्ये सर्दी व तापाचे प्रमाण जास्त आहे. सर्दी व ताप येणार्‍या रुग्णांना सर्दी व तापावरील औषध देतानाच डॉक्टरांकडून त्यांना कोरोनासाठीची चाचणी करून घेण्याचीही सूचना करण्यात येत आहे. राज्यातील विविध भागांत मलेरिया व डेंग्युचीही प्रकरणे आढळून येत असल्याने ताप आलेल्यांनी त्यासाठी रक्ताचीही तपासणी करून घ्यावी, असा सल्लाही डॉक्टरांकडून सध्या देण्यात येत आहे.

दरम्यान, तिसर्‍या लाटेचा धोका लक्षात घेऊन लहान मुलांना ताप, खोकला किंवा इतर लक्षणे दिसल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घेण्याचे निर्देश राज्य सरकारने यापूर्वीच दिलेले आहेत.