महाराष्ट्रात आजपासून संपूर्ण संचारबंदी

0
136

महाराष्ट्रात गेल्या महिन्याभरात सातत्याने वाढत असलेल्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात आज बुधवार दि. १४ पासून पुढील १५ दिवस कडक निर्बंध घालण्यात येणार आहेत. महाराष्ट्रात पुढील १५ दिवस संचारबंदी लागू केली असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल केली.

काल मुख्यमंत्री ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधताना आज बुधवारी रात्री ८ वाजल्यापासून हे निर्बंध लागू होणार असून राज्यात १४४ कलम लागू होणार आहे. पुढचे किमान १५ दिवस राज्यात संचारबंदी लागू असेल. अनावश्यक प्रवास पूर्णपणे बंद करावा लागेल. योग्य कारण नसेल, तर घराबाहेर पडू नका असे आवाहन केले.

अत्यावश्यक सेवा चालू
यावेळी मुख्यमंत्र्यांनी, अत्यावश्यक सेवा वगळून इतर सर्व सेवा बंद राहतील. सकाळी ७ ते रात्री ८ या काळात अत्यावश्यक सेवाच चालू राहतील. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आपण बंद करत नसल्याचे सांगून लोकल, बस सुरू राहतील. पण त्या अत्यावश्यक, जीवनावश्यक सेवा देणार्‍या वर्गाला येण्या-जाण्यासाठीच चालू असतील असे स्पष्ट केले.

बँका सुरू राहतील. दूरसंचार सेवा आणि त्यांच्याशी संबंधित देखभाल सेवा सुरू राहतील. अधिसूचनाधारक पत्रकारांना मुभा देण्यात आली आहे. पेट्रोल सेवांना मुभा देण्यात आली आहे. हॉटेल, रेस्टॉरंट यांच्यामधून होम डिलीव्हरी आणि टेक अवे यालाच परवानगी असेल. तिथे काम करणार्‍या कर्मचार्‍यांचे लसीकरण बंधनकारक असेल असे यावेळी मुख्यमंत्री म्हणाले.
नाईलाजाने ही बंधने आपण टाकत असून आरोग्यसुविधा तयार करण्यासाठी आणि साखळी तोडण्यासाठी ही बंधने स्वीकारावी लागतील असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.
आपण फेब्रुवारीपर्यंत कोविडवर नियंत्रण मिळवले होते. पण नंतर भयानक पद्धतीने रुग्णवाढ झाली आहे. आज तर ६० हजार २१२ रुग्ण राज्यात सापडले असून ही भीतीदायक परिस्थिती असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

राज्यातली ही परिस्थिती मी पंतप्रधानांना देखील सांगितली आहे. त्यांच्याकडे रोजच्या रोज अहवाल जातो आहे. आपण पारदर्शीपणे सगळ्या गोष्टींना धाडसाने तोंड देत असल्याची माहितीही यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिली. तसेच उद्योगधंद्यांना आधार देण्यासाठी जीएसटीच्या परताव्याला ३ महिन्यांची तरी मुदतवाढ द्यावी, अशी विनंती मी पंतप्रधानांना करणार आहे. त्याशिवाय, भूकंप, पूर या नैसर्गिक आपत्ती जाहीर होतात. कोरोना या नैसर्गिक आपत्तीप्रमाणेच इतर आपत्तींप्रमाणेच निकष लावून ज्यांच्या रोजीरोटीवर संकट आलेले आहे त्यांना वैयक्तिक मदत द्यावी, अशी विनंती मी पंतप्रधानांना करत असल्याचे ठाकरे म्हणाले.

यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी ब्रिटनचे उदाहरण देताना, ब्रिटनने अडीचतेतीन महिने लॉकडाऊन लावून ५० टक्के जनतेचे लसीकरण केले. त्यामुळे रुग्णालयावरचा ताण कमी झाला. मृत्यूदर कमी झाला. तसाच आपला प्रयत्न असल्याचे सांगितले.

निवृत्त डॉक्टरांना आवाहन
यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी, निवृत्त झालेल्या डॉक्टर, परिचारिकांना आवाहन करताना या सगळ्यांनी मदतीला येण्याचे आवाहन केले. तसेच सर्व स्वयंसेवी संस्था, व्यक्तींनाही त्यांना जी शक्य आहे ती ती मदत करण्याचे आवाहन केले. राजकीय पक्षांना आवाहन करताना ही एकमेकांची उणीदुणी काढण्याची वेळ नसून सर्वांनी संघटितपणे कोविडचा सामना करूया असे सांगितले. आपण एकसाथ लढून कोविडवर नियंत्रण मिळवूया असे जनतेलाही त्यांनी शेवटी आवाहन केले.