महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष ‘जैसे थे’

0
17

>> बंडखोर नेते एकनाथ शिंदेंकडून आवश्यक संख्याबळाची जुळवाजुळव सुरू

महाराष्ट्रात गेल्या दोन दिवसांपासून सत्तासंघर्ष सुरू असून, एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीनंतर शिवसेनेसमोर अभूतपूर्व अशी स्थिती निर्माण झाली आहे. मात्र बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्याजवळ वेगळा गट स्थापन करण्याइतपत संख्याबळ नसल्याने पुढील राजकीय हालचाली मंदावल्या आहेत. शिंदेंसोबत सध्या शिवसेनेचे ३५ आमदार आहेत; परंतु स्वतंत्र गट स्थापन करण्यासाठी त्यांना आणखी २ शिवसेना आमदारांची गरज आहे. त्यामुळे पूर्ण संख्याबळाची जुळवाजुळव झाल्याशिवाय हे बंडखोर आमदार मुंबईत परतण्याची शक्यता कमीच आहे. भाजपसोबत सत्ता स्थापनेची भाषा करणार्‍या शिंदेंजवळ आवश्यक संख्याबळ नसल्याने भाजपकडूनही सावध पावले टाकली जात आहे.

गेल्या काही महिन्यांपासून शिवसेनेत नाराज असलेले नेते एकनाथ शिंदे यांनी विधान परिषद निवडणुकीनंतर समर्थक आमदारांसह गुजरातमधील सूरतची वाट धरत बंड पुकारल्याने शिवसेनेत उभी फूट पडली. महाविकास आघाडीतून बाहेर पडून भाजपबरोबर युती करण्याची अट शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना घातल्याने त्यांच्या परतीचे दोर कापले गेले आहेत. त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार संकटात आले आहे. अशातच एकनाथ शिंदे यांच्यासह ३३ आमदार काल सूरतमधून विमानाने आसामच्या गुवाहाटीमध्ये पोहोचले. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना आपल्यासोबत ४० आमदार असल्याचा दावा केला. तसेच आणखी १० येणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे दोनी कोरोनाबाधित झाले असून, काल ठाकरेंनी कमलनाथ आणि शरद पवारांची भेट घेण्याचे टाळले.

उद्धव ठाकरेंनी शासकीय निवासस्थान सोडले
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी काल फेसुबक लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधताना वर्षा हे मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान सोडून मातोश्री बंगल्यावर जाण्याची तयारी दर्शवली होती. त्यानंतर अवघ्या दोन तासांत मुख्यमंत्र्यांनी वर्षा बंगला सोडत काल रात्री ते मातोश्रीवर दाखल झाले.

.. तर मुख्यमंत्री पद सोडण्यास तयार : ठाकरे
गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या सत्ता संघर्षावर काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी थेट फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधला. जर मी तुम्हाला मुख्यमंत्री म्हणून नको असेल, तर माझ्या समोर या आणि स्वत:हून सांगा. मी त्या क्षणी राजीनामा देण्यास तयार आहे. इतकेच नाही, तर शिवसेना पक्षप्रमुख म्हणून देखील मी नको असेल, तर ते पदही सोडण्यास आपण तयार आहे, असे ठाकरे यांनी सांगितले.

एकनाथ शिंदेंचे प्रत्युत्तर
उद्धव ठाकरे यांच्या भाषणानंतर एकनाथ शिंदे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. गेल्या अडीच वर्षात घडलेल्या काही मुद्यांच्या आधारे त्यांनी आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली. गेल्या अडीच वर्षात महाविकास आघाडी सरकारचा फायदा केवळ घटक पक्षांना झाला. यामध्ये शिवसैनिक भरडला गेला. एकीकडे घटक पक्ष मजबूत होत असताना शिवसैनिकांचे आणि शिवसेनेचे मात्र पद्धतशीर खच्चीकरण होत गेले, असे त्यांनी ट्विटमध्ये नमूद केले.