अफगाणिस्तानातील भूकंपात १००० जणांचा मृत्यू

0
13

>> दीड हजारांहून अधिक जखमी; भारतासह शेजारील देशांनाही जाणवले भूकंपाचे धक्के

अफगाणिस्तानला मंगळवारी मध्यरात्री ६.१ रिश्टर स्केल भूकंपाचा धक्का बसला. भूकंपामुळे मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली आहे. मध्यरात्री झालेल्या भूकंपात सुमारे १००० लोकांचा मृत्यू झाला असून, दीड हजारांहून अधिक लोक जखमी झाले आहेत. आपत्ती व्यवस्थापन विभागाचे उपमंत्री मौलवी शरफुद्दीन यांनी याबाबत माहिती दिली. यूएस जिओलॉजिकल सर्वेनुसार भूकंपाचा केंद्रबिंदू अफगाणिस्तानमधील खोस्त शहरापासून ४० किमी. अंतरावर होता.

अफगाणिस्तानच्या पक्तिका आणि खोस्त प्रांतात हा भूकंप झाला. भूकंपामुळे दोन्ही प्रांतातील घरांसह सार्वजनिक मालमत्तांची मोठी हानी झाली. सुरक्षा दलांकडून बचाव कार्य राबवण्यात येत असून, जखमी लोकांना ढिगार्‍यांखालून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या भूकंपामुळे अफगाणिस्तानमध्ये आतापर्यंत १००० लोकांचा मृत्यू झाला आहे, तर सुमारे १५०० लोक जखमी झाले आहेत. बर्मल, झिरुक, नाका आणि ग्यान या प्रांतातही हानी झाली. अफगाणिस्तान सरकारचे प्रवक्ते बिलाल करीमी यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली. तसेच भुकंपाचे धक्के जाणवलेल्या भागात मदतीसाठी आपत्कालीन संस्थांना आवाहनही करण्यात आले आहे.

दरम्यान, याआधी शुक्रवारी पाकिस्तानमध्ये भूकंप झाला होता. त्यावेळी इस्लामाबाद, पेशावर, रावळपिंडी आणि मुलतानमध्ये हे धक्के जाणवले होते. फैसलाबाद, अबोटाबाद, स्वात, बुनेर, कोहाट आणि मलकांडी येथेही हे धक्के जाणवले होते.

या भूकंपाचा प्रभाव ५०० किमी.च्या परिघात होता. त्यामुळे अफगाणिस्तानसोबत भारत आणि पाकिस्तानलाही भूकंपाचे धक्के जाणवले असल्याची माहिती युरोपीयन भूमध्य भूकंप विज्ञान केंद्राने दिली. पाकिस्तानमधील इस्लामाबाद, पेशावर, रावळपिंडी आणि मुलतान शहरांनाही भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले.