पणजी महानगरपालिका निवडणुकीसाठीचा प्रचार हा आज (दि. 9) संध्याकाळी 5 वाजता संपणार असून, बाबूश मोन्सेरात यांचे भाजप पुरस्कृत पॅनल आणि उत्पल पर्रीकर यांचे ‘आम्ही पणजीकर’ पॅनल अशा दोन पॅनलमध्ये ही थेट निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी बुधवार दि. 11 मार्च रोजी निवडणूक होणार असून, 30 जागांसाठी 69 उमेदवार रिंगणात आहेत. दरम्यान, या निवडणुकीचा निकाल 13 मार्चला जाहीर होणार आहे.
बाबूश मोन्सेरात यांच्या भाजप पुरस्कृत पॅनलच्या विरोधात यावेळेस सर्व विरोधी पक्ष एकत्र आलेले असून, त्यामुळे ही निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. पणजी महापालिकेच्या 30 प्रभागांसाठीच्या या निवडणुकीत यंदा 69 उमेदवार रिंगणात आहेत. यंदा विरोधी पक्षांनी उत्पल पर्रीकर यांच्या पॅनलला पाठिंबा दिलेला असल्याने बहुतांश प्रभागांमध्ये एकास एक उमेदवार याप्रमाणे थेट लढती होणार आहेत. मात्र, त्याचा फायदा नक्की कुणाला मिळेल हे पहावे लागणार असल्याचे राजकीय निरीक्षकांचे म्हणणे आहे. मात्र, सगळे विरोधक एकत्र आलेले असल्याने विरोधी मतांची होणारी विभागणी टाळली जाणार आहे. या दोघांमध्ये कोण सरस ठरतो याकडे पणजीवासियांसह समस्त गोमंतकीयांचे लक्ष लागून राहिले आहे.
बाबूश मोन्सेरात व त्यांची पत्नी जेनिफर मोन्सेरात ही दोघेही आमदार असून, त्यांचा पुत्र हा पणजीचा महापौर असल्याचा मुद्दा उपस्थित करून ही घराणेशाही आता संपायला हवी, असे त्यांनी म्हटले आहे.
‘आम्ही पणजीकर’चा जाहीरनामा प्रसिद्ध
उत्पल पर्रीकर यांच्या ‘आम्ही पणजीकर’ या पॅनलने काल आपला पणजी शहरासाठीचा जाहीरनामा प्रसिध्द केला. ‘वचननामा 2026′ असे या जाहीरनाम्याचे नामकरण करण्यात आले आहे. त्यात शहरातील पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा, वाहतूक व्यवस्थेत सुधारणा, स्वच्छ शहर उपक्रम, पारदर्शक प्रशासन यांचा समावेश आहे.