Home बातम्या गॅस दरवाढीच्या निषेधार्थ महिला काँग्रेसची निदर्शने

गॅस दरवाढीच्या निषेधार्थ महिला काँग्रेसची निदर्शने

0

केंद्र सरकारने एलपीजीच्या दरात वाढ केल्याच्या निषेधार्थ काल गोवा महिला काँग्रेसने पणजीत निदर्शने केली. या निदर्शनात महिला काँग्रेसच्या सदस्या मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.

काँग्रेस हाऊसजवळ केलेल्या या निदर्शनावेळी प्रदेश महिला काँग्रेसच्या सरचिटणीस मनीषा उसगावकर यांनी एलपीजी सिलिंडरला फुलांचा हार घातला व हातात लाकडांची मोळी घेऊन आता गृहिणींना एलपीजी सिलिंडर खरेदी करणे परवडणार नसून, त्यांना स्वयंपाकासाठी लाकडे पुरवण्याची सोय सरकारने करावी, अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. घरगुती वापरासाठीच्या गॅस सिलिंडरवर सरकारने तब्बल 60 रुपये, तर व्यावसायिक वापरासाठीच्या सिलिंडरच्या दरात 115 रुपये एवढी मोठी दरवाढ केलेली असून, आता सर्वसामान्य जनतेने काय करावे, असा प्रश्न उसगावकर यांनी केला. गोवा सरकार राज्यात मोठ्या प्रमाणात महोत्सवाचे आयोजन करीत असते. या महोत्सवांवर कोट्यवधी खर्च करणाऱ्या गोवा सरकारने राज्यातील जनतेला गॅस सिलिंडरवर अनुदान देऊन दिलासा द्यावा, अशी मागणीही उसगावकर यांनी केली.

या दरवाढीचा गृहिणींना तर फटका बसणार आहेच. शिवाय छोटी-मोठी चहाची दुकाने, वडापाव, ऑम्लेट आदींची विक्री करून पोट भरणाऱ्यांनाही या दरवाढीचा मोठा फटका बसणार असल्याचे त्या म्हणाल्या. महिलादिनी महिलांना एखादी चांगली भेट देण्याचे सोडून सरकारने गॅस दरवाढ करून महिलांना एकप्रकारे शिक्षाच केली असल्याचा आरोपही यावेळी उसगावकर यांनी केला. 2012 साली परिवर्तनाची भाषा करून भाजप सरकार सत्तेवर आले होते. मात्र, त्या परिवर्तनाचा आता भाजपला विसर पडला असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी
केला.