महाड सावित्री पूल दुर्घटना; आणखी दोन मृतदेह सापडले

0
100

>> अजूनही १६ जणांचा शोध जारी

 

सावित्री पूल दुर्घटनेच्या पाचव्या दिवशी काल सकाळी दोन मृतदेह सापडले. त्यामुळे मृतांची संख्या २७ वर पोचली असून ४१ बेपत्ता व्यक्तींपैकी अजूनही १६ जणांचा शोध जारी आहे. नौदलाच्या पथकाबरोबरच पाणबुडे व अत्याधुनिक कॅमेर्‍यांचा वापर या मोहिमेत केला जात आहे.
जोरदार पाऊस, नदीचा प्रचंड वेग यामुळे मृतदेह १२० कि. मी. अंतरापर्यंत वाहून गेल्याची शक्यता वर्तवली जात आहे. सावित्री पुलापासून ३ कि. मी. अंतरावर नौदलाला एसटी तसेच इतर वाहनांचे काही अवशेष हाती लागले आहेत. त्यामुळे दोन्ही एसटी बसेस पुलापासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या दादली पुलापर्यंतच्या भागात असाव्या, असा शोध पथकांचा अंदाज आहे. हेलिकॉप्टरच्या मदतीने तटरक्षक दल व एनडीआरएफच्या जवानांनी वाहनांचा शोध घेण्याची मोहीम याच पट्‌ट्यामध्ये केंद्रित केली आहे. या भागात नदीचे पात्र खोल असून तेथेच एसटी बसचा एक फायबरचा तुकडा व तवेरा कारच्या कॅरियरचे स्टँड सापडले आहे. त्यामुळे याच भागात बसेस सांगाड्याच्या स्वरूपात असण्याची शक्यता असून काही मृतदेह अडकून पडले असण्याची शक्यता आहे.