अरबी समुद्रातील वादळामुळे राज्यातील मच्छीमारीवर परिणाम

0
109

गेल्या १ रोजीपासून राज्यातील मच्छीमारी बंदी उठवली असली तरी अरबी समुद्रातील वादळामुळे राज्यातील मच्छीमारांना समुद्रात मच्छीमारीसाठी जाता आलेले नाही, असे मच्छीमारी खात्याच्या संचालक डॉ. शामिला मोंतेरो यांनी काल सांगितले. पावसाचा जोर कायम असल्याने पुढील काही दिवसही ही स्थिती कायम राहण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.

अरबी समुद्रात जोरदार पाऊस व वादळी वारे असल्याने मच्छीमारांनी मच्छीमारीसाठी खवळलेल्या समुद्रात जाण्याचा धोका पत्करू नये, असा इशारा हवामान खात्याने तसेच मच्छीमारी खात्यानेही मच्छीमारांना दिलेला आहे. त्यामुळे राज्यातील सुमारे ८०० ट्रॉलर्सना समुद्रात जाता आलेले नाही, असे डॉ. मोंतेरो यांनी सांगितले.
दरम्यान, समुद्र खवळलेला असल्याने ट्रॉलरवाल्यांनी समुद्राऐवजी नद्यांत मासेमारी करण्याचे सत्र आरंभले आहे. या लोकांनी जुवारी व अन्य नद्यांवर अतिक्रमण केल्याने मासेमारी करता येत नसल्याचे रापणकार संघटनेतील सूत्रांनी सांगितले.
पारंपरिक मच्छीमार हे नद्यात अथवा समुद्रात किनार्‍यापासून जरा दूर मासेमारी करीत असतात. ट्रॉलरवाले हे खोल समुद्रात जात असतात. मात्र, आता वादळामुळे खोल समुद्रात जाता येत नसल्याने या लोकांनी नद्यांकडे मोर्चा वळवला असून त्यामुळे आम्हाला मासेमारी करता येत नसल्याचे रापणकारांचे म्हणणे आहे.
दरम्यान, ट्रॉलरवाले अजून मासेमारीसाठी एल्‌ईडी दिव्यांचा वापर करीत असल्याचे रापणकाराचे म्हणणे आहे.