महागाईमुळे जनता हवालदिल ः चोडणकर

0
134

>> इंधन दरवाढीविरोधात कॉंग्रेसची निदर्शने

>> केंद्र सरकारवर टीका

वाढत्या इंधन दरवाढीच्या निषेधार्थ काल शुक्रवारी कॉंग्रेस पक्षाने देशव्यापी आंदोलन आयोजित केले होते. त्या पार्श्‍वभूमीवर गोवा प्रदेश कॉंग्रेस समितीतर्फे नेवगीनगर, पणजी येथील पेट्रोलपंपावर निदर्शने करण्यात आली होती.
यावेळी बोलताना प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी, केंद्र सरकारला ३५ रु. ६३ पैसे एवढ्या कमी दरात एक लिटर पेट्रोल मिळते. मात्र हेच पेट्रोल लोकांना तब्बल ९३ रु. ८० पैसे एवढ्या भरमसाठ किंमतीत विकून मोदी सरकार जनतेचे खिसे रिकामे करीत असल्याचा आरोप केला. सरकारला डिझेलही अत्यंत कमी म्हणजे ३८ रु. १६ पैसे प्रती लिटर या दरात मिळत असून हे डिझेलही सरकार तब्बल ९१ रु. ५० पैसे या दरात विकत असल्याने जनता हवालदिल झाली असल्याचे चोडणकर म्हणाले.

वाढत्या इंधन दरांमुळे जनतेला मोटारगाड्या घेऊन फिरता येत नसल्याचे स्पष्ट करण्यासाठी यावेळी निदर्शनकर्ते बैलगाडी घेऊन आले होते. तसेच केंद्रातील सरकार हे सूटबूटवाल्यांचे सरकार आहे हे दाखवून देण्यासाठी निदर्शनकर्त्यांपैकी काही जणांनी सूट परिधान केले होते.

कोविड महामारीच्या काळात देशभरातील जनता महागाईमुळे भरडून निघालेली असताना मोदी सरकार मात्र ‘अच्छे दिन’च्या नावाखाली लोकांची लूट करीत असल्याचा आरोपही चोडणकर यांनी यावेळी केला.

मोदी सरकारने पेट्रोलवर व्हॅट, जकात कर, अबकारी कर, वाहतूक कर, कृषी साधन सुविधा विकास सेस व अन्य कर लावलेले असून त्यामुळे ३५ रु.चे पेट्रोल जनतेला ९३ रु. ८० पैसे तर ३८ रु. चे डिझेल ९१ रु. ५० पैसे लिटर एवढ्या भरमसाठ किंमतीत खरेदी करावे लागत असल्याचे चोडणकर यांनी यावेळी सांगितले.

२०१४ साली केंद्रात मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून या सरकारने पेट्रोल व डिझेलचे दर भरमसाठ वाढवून लोकांकडून २२ लाख ७० हजार कोटी रु. जमवले तर राज्य सरकारने १३ लाख ११ हजार कोटी रु. जमवल्याचे ते म्हणाले. यावेळी अन्य कॉंग्रेस कार्यकर्त्यांचीही भाषणे झाली.