मराठी गझल या मातीतीलच : वैराळकर

0
153

>> गझल लेखनकार्यशाळेचे उद्घाटन

 

गझल हा कवितेचाच प्रकार आहे. परंतु तिचा आकृतीबंध वेगळा असतो. तंत्रशुद्धतेचा इथे काटेकोरपणाने अवलंब करावा लागतो. मराठी गझल या मातीतील आहे. त्यातील प्रतिके, प्रतिमा अस्सल मराठीतील आहेत असे प्रतिपादन गझल या प्रकाराचे व्यासंगी विद्वान सुरेशकुमार वैराळकर यांनी येथे केले.
कला आणि संस्कृती संचालनालयातर्फे संस्कृती भवनच्या व्याख्यानकक्षात आयोजित करण्यात आलेल्या गझल लेखन कार्यशाळेच्या उद्घाटन सत्रात आपल्या बीज भाषणात श्री. वैराळकर यांनी उपरोल्ललेखित मत व्यक्त केले. दै. नवप्रभाचे संपादक परेश प्रभू यांच्या हस्ते या कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी कला संस्कृती खात्याचे उपसंचालक अशोक परब उपस्थित होते. कार्यशाळेचे प्रमुख संचालक श्री. वैराळकर, गझलकार शिवाजी जवरे आहेत. दि. २३ रोजी कार्यशाळेचा समारोप गझल मुशायराने होणार असून त्यात वैराळकर, श्री. जवरे व पुण्यातील तसेच गोव्यातील नामवंत गझलकार सहभागी होतील.
श्री. वैराळकर म्हणाले की, आज मराठीत पाचशे चांगले गझलकार आहेत. महिला गझलकारांची संख्या मात्र केवळ साठ आहे. तसे पाहिले तर गझलेचे वेदनेशी जवळचे नाते असते व स्त्रियांचेही वेदनेशी जवळचे नाते आहे. अशा वेळी व्यक्त व्हायला स्त्रिया गझलकडे का वळत नाहीत? कुठे कमी पडतात कळत नाही. नवव्या शतकात इराणमध्ये गझलेचा जन्म झाला असे मानले जाते याकडे निर्देश करून १९ व्या शतकात संगीत नाटकात वृत्त, छंद हा गझलांचा प्रकार आढळतो. नंतर माधव ज्युलीयनचा काळ सुरू झाला. रवीकिरण मंडळाने मंचीय कविता लोकप्रिय केली. १९४० ते ६५ या काळात मराठी गझलेची पिछेहाट झाली. याकडे लक्षवेधून वैराळकर यांनी सांगितले की, वसंत बापट, बोरकर, कुसुमाग्रज, करंदीकर आदींनी गझलेच्या फॉर्ममध्ये कविता केल्या. १९८१ मध्ये मराठीतील अधिकृत गझलसंग्रह प्रकाशित केला. १९८३ मध्ये सुरेश भटांच्या ‘एल्गार’ने मराठी गझलेला उभारी दिली.
श्री. प्रभू म्हणाले की, गझल हा तंत्रगामी प्रकार आहे. तंत्राबरोबरच गझल करणार्‍याला मंत्रही माहीत असणे आवश्यक असते. उर्दूची नजाकत, शब्दांचे सामर्थ्य मराठीत आहे हे सुरेश भटांनी दाखवून दिले. गझलेत शब्दांच्या खोगिरभरतीला वाव नसतो. भाषेवर हुकमत नसेल तर चांगली गझल लिहिता येत नाही याची जाणीव देऊन त्यांनी काही मराठी भाषेचे सामर्थ्य दाखविणार्‍या सुरेश भटांसह मान्यवरांच्या गझला उधृत करून मान्यवरांच्या मार्गदर्शनाखाली होणारी ही कार्यशाळा संधी असून त्याचा लाभ घ्या असे प्रशिक्षणार्थींना आवाहन केले. अशोक परब यांनी स्वागत केले. प्रदीप नाईक यांनी सूत्रसंचालन केले.

आजचे कार्यक्रम
सकाळी १० ते ११.३० ः गझलेचे व्याकरण आणि बांधणी – शिवाजी जवरे, सुरेशकुमार वैराळकर.
११.४५ ते १.४५ ः गझलेचे प्रारंभिक व्याकरण – शिवाजी जवरे, प्रमोद खराडे
१.४५ ते ३.०० ः भजन
३.०० ते ४.०० ः गझलेचे तंत्र आणि मंत्र – शिवाजी जवरे, प्रमोद खराडे, सुरेशकुमार वैराळकर.
४.१५ ते ५.०० ः गझलेचे तंत्र आणि मंत्र – शिवाजी जवरे, प्रमोद खराडे, सुरेशकुमार वैराळकर.
उद्या गझलरंग मुशायरा
सकाळी १०.०० ते ११.३० ः गझलेतील काफिया आमि रदिफ – शिवाजी जवरे, सुरेशकुमार वैराळकर.
११.४५ ते १.४५ ः गझलेतील अलामतचे महत्त्व – शिवाजी जवरे, सुरेशकुमार वैराळकर.
१.४५ ते ३.०० ः जेवण
३.०० ते ४.०० ः उजळणी व मुक्त चर्चा – शिवाजी जवरे, प्रमोद खराडे, सुरेशकुमार वैराळकर.
४.०० ते ४.४५ ः समारोप सोहळा.
५.०० ते ७.०० ः ‘गझलरंग मुशायरा’ ः सुरेश भट गझल मंच पुणे व स्थानिक कलाकार.