मये क्रिकेटर्स, जय गणेश विजयी

0
70

मये क्रिकेटर्स, जय गणेश विजयी

शापोरा येथील मनोर्वा स्पोटर्‌‌स अँड कल्चरल क्लबने आयोजित केलेल्या १३व्या अखिल गोवा पातळीवरील लेदरबॉल क्रिकेट स्पर्धेतील रविवारी (१७ रोजी) झालेल्या सामन्यांत मये क्रिकेटर्स व जय गणेश यांनी विजय नोंदविले. दिवसातील पहिल्या सामन्यात मये संघाने कळंगुटच्या जांबळेश्‍वर क्रिकेटरला ५ गड्यांनी तर दुसर्‍या सामन्यात जय गणेशने बेतीच्या कालिका इलेव्हनचा ७१ धावांनी पराभव केला.
पहिल्या सामन्यात मयेने नाणेफेक जिंकून कळंगुटला प्रथम फलंदाजीचे निमंत्रण दिले.

मये संघाच्या नियंत्रित मार्‍यासमोर कळंगुटला १८ षटकांत ७ बाद १२४ धावांपर्यंतच मजल मारता आली. त्यांच्या संतोष नारुलकरने सर्वाधिक ३३ तर गौरव देसाई व रामनाथ शिरोडकर यांनी प्रत्येकी २० धावा केल्या. मयेकडून उदय राऊत व गिरीश कारबोटकर यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. विजयासाठी आवश्यक धावा मयेने १७.५ षटकांत ५ गडी गमावून केल्या. ओंकार गावसने नाबाद ५७ व गिरीश कारबोटकरने ४४ धावांचे योगदान देत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.
दुसरा सामना एकतर्फी ठरला. सिद्धेश दाभोळकरच्या केवळ १५ चेंडूंतील तुफानी ४४ धावा व वेंकटेश माईणकरच्या नाबाद ४९ धावांवर आरूढ होत जय गणेशने १५ षटकांत ४ बाद १८१ धावा चोपल्या. बेती संघातर्फे विजय के. याने ३२ धावांत ३ गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना बेतीला ४ बाद ११० धावांपर्यंतच मजल मारणे शक्य झाले. त्यांच्याकडून अमोघने नाबाद ३९ धावांची खेळी साकारली. जय गणेशच्या मयुरानंद मांद्रेकरने २ तर आनंद नाईक व पुंडलिक मडगावकरने १ गडी बाद केला.