न्यूझीलंडची विजयी सलामी

0
76
Doug Bracewell of New Zealand (L) and Tim Southee (R) celebrates the wicket of the West Indies Jason Holder during the first ODI cricket match between New Zealand and the West Indies at Cobham Oval in Whangarei on December 20, 2017. / AFP PHOTO / MICHAEL BRADLEY

वेस्ट इंडीजविरुद्ध काल बुधवारी झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात यजमान न्यूझीलंडने पाच गडी व २४ चेंडू राखून विजय मिळविला. संघात पुनरागमन करून चार बळी घेतलेला मध्यमगती गोलंदाज डग ब्रेसवेल सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. विंडीजने विजयासाठी ठेवलेले २५० धावांचे माफक लक्ष्य न्यूझीलंडने ४६ षटकांत गाठले.

न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन याने नाणेफेक जिंकून विंडीजला प्रथम फलंदाजीचे निमंत्रण दिले. स्थिरावण्यासाठी सुरुवातीची चार षटके घेतल्यानंतर गेल व लुईस यांनी धावा जमवल्या. गेलच्या मर्यादित हालचालीमुळे एकेरी-दुहेरी धावांपेक्षा मोठ्या फटक्यांवर या द्वयीने जास्त लक्ष केंद्रित केले. १०.१ षटकांत ४० धावांची सलामी या दोघांनी दिली. ब्रेसवेलने गेलला बाद करत ही जोडी फोडली. पुढच्याच चेंडूवर शेय होप (०) याला तंबूचा रस्ता दाखवून ब्रेसवेलने विंडीजची स्थिती २ बाद ४० अशी केली. शिमरोन हेटमायर (२९) याने तिसर्‍या गड्यासाठी ६२ धावांची भागीदारी रचत विंडीजचा कोसळता डोलारा सावरला. हेटमायरच्या पतनानंतर विंडीजचा डाव पुन्हा गडगडला. २ बाद १०३ अशा सुस्थितीतून ५ बाद १३४ अशी केविलवाणी स्थिती त्यांची झाली. लुईस सहाव्या गड्याच्या रुपात बाद झाला. त्याने ७५ धावा केल्या.

अष्टपैलू रोव्हमन पॉवेलने ५० चेंडूंत ५९ धावा चोपून विंडीजला अडीचशे धावांच्या जवळ नेले. न्यूझीलंडकडून ब्रेसवेलने ५५ धावांत ४ तर लेगस्पिनर टॉड ऍस्टलने ३३ धावांत ३ गडी बाद केले. वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसनने २ बळी घेतले. धावांचा पाठलाग करताना जॉर्ज वर्कर(५७) व कॉलिन मन्रो (४९) यांनी न्यूझीलंडला केवळ १०० चेंडूंत १०८ धावांची खणखणीत सलामी देत विजयाचा पाया रचला. कर्णधार केन विल्यमसनने ३५ धावांचे योगदान दिले. रॉस टेलर ४९ व टॉड ऍस्टल १५ धावांवर नाबाद राहिला. विंडीजकडून ऍश्‍ले नर्स व जेसन होल्डर यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. मालिकेतील दुसरा सामना ख्राईस्टचर्च येथे २३ डिसेंबर रोजी खेळविला जाणार आहे.