Home Featured मद्य घोटाळा : केजरीवाल, सिसोदिया निर्दोष

मद्य घोटाळा : केजरीवाल, सिसोदिया निर्दोष

0

राऊस एव्हेन्यू न्यायालयाचे सीबीआयवर ताशेरे; सर्व 23 जणांना ठरवले निर्दोष; सीबीआयच्या आरोपपत्रातील अनेक त्रुटींवर बोट

दिल्लीतील कथित मद्य धोरण घोटाळा प्रकरणात माजी मुख्यमंत्री तथा आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल आणि माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना राऊस एव्हेन्यू न्यायालयाने काल निर्दोष ठरवले. या दोन्ही नेत्यांसह अन्य 23 जणांना देखील सबळ पुराव्यांअभावी निर्दोष ठरवण्यात आले. हा निकाल देताना न्यायालयाने सीबीआयला चांगलेच फटकारले. सीबीआयने दाखल केलेल्या आरोपपत्रात अनेक त्रुटी असून, काही महत्त्वाच्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे देण्यात तपास यंत्रणेला अपयश आल्याचे निरीक्षण नोंदवले. संवैधानिक किंवा सार्वजनिक पदावर असलेल्या व्यक्तींवर गंभीर आरोप करताना ठोस पुरावे असणे अत्यावश्यक आहे; केवळ आरोप पुरेसे नसतात, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. दरम्यान, या घोटाळ्यातील पैसा आम आदमी पक्षाने गोवा विधानसभा निवडणुकीत वापरला होता, असा आरोपही झाला होता.

दिल्लीच्या कथित मद्य धोरण घोटाळा प्रकरणातील सर्व 23 आरोपींना न्यायालयाने दोषमुक्त केले. त्यात अबकारी विभागाचे माजी आयुक्त कुलदीप सिंग, नरेंद्र सिंग, विजय नायर, अभिषेक बोईनपल्ली, अरुण पिल्लई, मुथा गौतम, समीर महेंद्रू, मनीष सिसोदिया, अमनदीप सिंग धल्ल, अर्जुन पांडे, बुच्चीबाबू गोरंटला, राजेश जोशी, दामोदर प्रसाद शर्मा, प्रिन्स कुमार, अरविंद कुमार सिंग, चरणप्रीत सिंग, के. कविता, अरविंद केजरीवाल, दुर्गेश पाठक, अमित अरोरा, विनोद चौहान, आशिष चंद माथूर आणि सरथ रेड्डी यांना निर्दोष ठरवले.

‘एवढे सुमार आरोपपत्र
आजवर पाहिले नाही’

हा निकाल देताना विशेष न्यायाधीश जितेंद्र सिंह यांनी सीबीआयच्या कामावर अत्यंत कडक शब्दांत ताशेरे ओढले असून, इतक्या चुका असलेले दोषारोपपत्र मी आजवर कधीच पाहिले नाही, असे नमूद केले. जितेंद्र सिंह यांनी सीबीआयच्या तपासातील त्रुटींवर बोट ठेवले. मी पहिल्यांदाच असे आरोपपत्र पाहिले आहे, ज्यात इतक्या मोठ्या प्रमाणात उणिवा आहेत. सीबीआयने सादर केलेले दस्तऐवज आणि त्यांचे दोषारोपपत्र यामध्ये कुठेही ताळमेळ बसत नाही, असे न्यायाधीश जितेंद्र सिंह म्हणाले.

गुन्हेगारी कट सिद्ध करण्यात अपयश
अरविंद केजरीवाल यांना या प्रकरणात आरोपी क्रमांक 18 बनवण्यात आले होते. मात्र, मद्य धोरण तयार करण्यामागे कोणताही गुन्हेगारी कट किंवा चुकीचा हेतू होता, याचे ठोस पुरावे सादर करण्यात तपास यंत्रणा पूर्णपणे अपयशी ठरली. कोणत्याही पुराव्याअभावी कोणालाही दोषी धरता येणार नाही, असे सांगत न्यायालयाने केजरीवाल, सिसोदिया आणि इतर सहकाऱ्यांना क्लिन चिट दिली.

नेमके प्रकरण काय?
2022 मध्ये दिल्ली मद्य धोरणात गैरप्रकार झाल्याचा आरोप तत्कालीन मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्याविरोधात करण्यात आला होता. 100 कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपविण्यात आला होता. सीबीआयकडून याबाबत विविध पुरवणी आरोपपत्रेही दाखल केली होती. अरविंद केजरीवाल यांच्यासह 23 जणांची नावे आरोपपत्रात नमूद करण्यात आली होती. एकूण 2 हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप भाजपने केला होता; मात्र ते सर्व आरोप निराधार ठरले.

मोदी, शहांनी राजकीय
कट रचला : केजरीवाल

सत्याचा विजय झाला आहे. नरेंद्र मोदी आणि अमित शहांनी देशातील सर्वात मोठा राजकीय कट रचला. आम आदमी पक्षाच्या पाच मोठ्या नेत्यांना तुरुंगात टाकले. भारतातच्या इतिहासात पहिल्यांदाच मुख्यमंत्री पदावर असलेल्या व्यक्तीला तुरुंगात ठेवण्यात आले. सिसोदियांना दोन वर्षे तुरुंगात ठेवले. केजरीवाल भ्रष्टाचारी आहेत असा आरोप करण्यात आला; पण मी भ्रष्टाचारी नाही, असे म्हणताना केजरीवालांना अश्रू अनावर झाले. त्यावेळच्या विद्यमान मुख्यमंत्र्याला घरातून फरफटत नेऊन तुरुंगात टाकले. सहा महिने तुरुंगात ठेवले गेले. जे भारताच्या इतिहासात कधी घडले नाही, असेही केजरीवाल म्हणाले.

अरविंद केजरीवालांनी
नरेंद्र मोदींना दिले आव्हान

दिल्लीच्या कथित मद्य धोरण घोटाळ्यात निर्दोष ठरल्यानंतर आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना एक आव्हान दिले. आता लगेचच दिल्लीत तुम्ही निवडणूक घ्या, भाजपच्या 10 पेक्षा अधिक जागा निवडून आल्यास राजीनामा देईन, असे केजरीवाल म्हणाले. मोदी आणि अमित शहा यांनी देशाची माफी मागावी, असे देखील केजरीवाल म्हणाले.

न्यायालयाने सीबीआयला फटकारले
तपासातील त्रुटींवरुन न्यायालयाने सीबीआयला कठोर शब्दांत फटकारले. मोठ्या आरोपपत्रात अनेक त्रुटी आहेत. या शिवाय साक्षीदार किंवा सबळ विधानाने आरोप सिद्ध केले नाहीत, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. सीबीआय सिसोदिया यांच्याविरुद्ध प्रथमदर्शनी खटला तयार करण्यात अपयशी ठरली, असेही न्यायालयाने म्हटले, तर कोणत्याही ठोस पुराव्याशिवाय केजरीवाल यांना गोवण्यात आल्याचे न्यायालयाने नमूद केले.

सीबीआयची उच्च न्यायालयात धाव
कनिष्ठ न्यायालयाने कथित मद्य धोरण घोटाळ्यात केजरीवाल आणि सिसोदिया यांच्यासह 23 जणांना निर्दोष ठरवल्यानंतर या निवाड्याविरोधात सीबीआयने दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान याचिका दाखल केली आहे.

निकालानंतर केजरीवाल यांना अश्रू अनावर
सत्याचा विजय झाला आहे, केजरीवाल, सिसोदिया भ्रष्टाचारी नाहीत, इमानदार आहेत, अशा शब्दात अरविंद केजरीवाल यांनी निकालाचे स्वागत केले. यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले.

नरेंद्र मोदी, शहांनी षड्यंत्र रचले : केजरीवाल
न्यायालयाचा निकाल ऐतिहासिक आहे. हे पूर्ण षड्‌‍यंत्र नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी रचले. त्यांनी पूर्ण देशाची माफी मागितली पाहिजे. दोघांनी मिळून षडयंत्र रचले आणि आम आदमी पक्षाला संपवण्याचा प्रयत्न केला, असे अरविंद केजरीवाल म्हणाले.