मतलबी मैत्री

0
189

अमेरिका आणि भारत यांच्यात परराष्ट्रमंत्री व संरक्षणमंत्री स्तरावर होणारी २ बाय २ बोलणी पुन्हा एकवार लांबणीवर पडली आहेत. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉंपिओ हे डोनाल्ड ट्रम्प व किम जोंग उन यांच्यात सिंगापूरला झालेल्या आण्विक निरस्त्रीकरणाच्या समझोत्यासंदर्भात उत्तर कोरियाच्या भेटीवर जाणार असल्याने ही बोलणी पुढे ढकलली गेल्याचे स्पष्टीकरण अमेरिकेने दिले आहे. मात्र, अमेरिकेच्या नव्या राजवटीतील बदललेल्या व्यापारी धोरणांमुळे भारत – अमेरिकेदरम्यान निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हे घडले असल्याने भुवया उंचावल्या जाणे स्वाभाविक आहे. यापूर्वी तत्कालीन परराष्ट्रमंत्री रेक्स टिलरसन यांची ट्रम्प यांनी गच्छंती केल्याने ही बोलणी रद्द झाली होती. ट्रम्प आणि मोदी यांच्या कितीही गळाभेटी झाल्या तरी शेवटी वेळ येते तेव्हा अमेरिका आपले खरे दात दाखवत असते. चीनशी त्यांचे जे व्यापारी युद्ध सध्या सुरू झाले आहे, त्याची झळ आता भारतालाही लागली आहे आणि ट्रम्प यांनी भारतावर अलीकडेच ओढलेले ताशेरे लक्षात घेता उभय देशांच्या मैत्रीचे पोवाडे गाणार्‍यांना सध्या तरी थोडे मूग गिळणे भाग आहे. डोनाल्ड ट्रम्प सत्तारूढ झाल्यापासून त्यांनी जी ‘अमेरिका फर्स्ट’ नीती अवलंबिली आहे, ती व्यापार उदिमाच्या बाबतीतही त्यांनी पुढे नेली आहे. चीन, युरोपीय देश किंवा भारताशी अमेरिकेचा जो व्यापार चालतो, तो एकतर्फी असून आपल्या देशासाठी नुकसानदायक असल्याचे सांगत ट्रम्प यांनी मध्यंतरी आयात होणार्‍या वस्तूंवर प्रचंड कर लादले. त्याला प्रत्युत्तर म्हणून आधी चीनने आणि नंतर भारतानेही अमेरिकेतून आपल्या देशात आयात होणार्‍या वस्तूंवरील करांत तितकीच वाढ केली. भारताने अमेरिकेतून होणार्‍या आयातीवर कर लागू करताच ट्रम्प यांनी त्यावर कडक ताशेरे ओढले. काही अमेरिकी वस्तूंवर भारताने अगदी शंभर टक्के कर लादल्याचे त्यांचे म्हणणे होते, परंतु शेवटी जशास तसे पाऊल उचलणे भारतासाठीही आवश्यकच ठरले होते. ‘‘आम्ही जगासाठी बँक बनलो आहोत, ज्यातून जो तो पैसे चोरू पाहतो आहे’’ असे ट्रम्प यांचे एकंदरीत म्हणणे आहे. खरे तर चीन आणि अमेरिका यांच्यातील व्यापारी देवाणघेवाण जागतिकीकरणानंतर गेल्या वीस वर्षांत प्रचंड वाढली आहे. अनेक क्षेत्रांमध्ये चिनी उत्पादकांनी अमेरिकेची बाजारपेठ जणू काबीज केली आहे. अमेरिका – चीन दरम्यान जसा हा व्यापार वाढला तशी व्यापारी तूटही अर्थातच वाढत गेली. चीनकडून अमेरिकी जनता खेळणी, मोबाईल, संगणक, दूरसंचार साधने, कपडे, फर्निचर वगैरे भरपूर गोष्टी स्वस्त असल्याने आयात करीत असते. या तयार वस्तूंच्या आयातीमुळे अमेरिकेतील स्थानिक उत्पादनांवर परिणाम झाला आणि उत्पादन मंदावल्याने रोजगाराची समस्या निर्माण झाली. हा असमतोल दूर करण्यासाठी ट्रम्प आग्रही आहेत. आपल्या आपमतलबी नीतीनुसार ते अमेरिकेच्या हितार्थ ही व्यापारी तूट कमी करायला निघाले आहेत. त्यातूनच त्यांचा चीन, युरोपीय महासंघ आणि भारताशी हा सुप्त संघर्ष उभा ठाकला आहे. त्यातच भारताने इराणकडून कच्चे तेल खरेदी करणे येत्या नोव्हेंबरपर्यंत थांबवावे असा निर्वाणीचा इशाराही त्यांनी दिला आहे. इराण हा भारताचा तिसरा मोठा तेल पुरवठादार देश आहे. त्या देशाशी ओबामांनी केलेल्या अणुकरारातून बाहेर पडल्यानंतर ट्रम्प यांनी इराणवर निर्बंध घालण्याच्या दिशेने पावले टाकायला सुरूवात केली आहे. त्यामुळे भारताचा त्याच्याशी चाललेला व्यापार त्यांना मान्य नाही. इराणकडून होणार्‍या कच्च्या तेलाची आयात थांबली तर त्याला पर्याय भारतापाशी आहेत असे आपल्या पेट्रोलिअम मंत्र्यांनी कालच म्हटले आहे, परंतु भारतासाठी हे एवढे सोपे नाही. चीनने पाकिस्तानात चालवलेल्या गुंतवणुकीला प्रत्युत्तर म्हणून इराणच्या छबाहर बंदराचा विकास भारत करतो आहे हे सर्वविदित आहे. त्याचे काय होणार हाही प्रश्न आहे. अमेरिका आपला भारताशी असलेला व्यापार एकतर्फी राहू नये यासाठी येथील बाजारपेठेत आपली कृषी उत्पादने, दूध वगैरे वस्तू उतरवू पाहतो आहे. तसे झाले तर ती आधीच संकटात असलेल्या आपल्या शेतकर्‍यांसाठी मृत्युघंटा ठरेल. हरितक्रांती, धवलक्रांतीने स्वयंपूर्ण बनलेल्या भारताला आज अशा गोष्टींच्या आयातीची आवश्यकता नाही. परंतु अमेरिका दबावनीती अवलंबून भारतीय बाजारपेठेत शिरकाव करण्यास उत्सुक आहे. दोन्ही देशांतील परराष्ट्रमंत्री व संरक्षणमंत्री यांच्यात एकीकडे संरक्षण, दहशतवाद, सुरक्षा आदी विषयांवर चर्चा अपेक्षित असली तरी दुसरीकडे व्यापारी तूट, एच१बी व्हिसा आदी विषयांमध्ये अमेरिका केवळ स्वहित पाहून निर्णय घेत आली आहे. जेथे स्वार्थ असतो तेथे मैत्री वाढू शकत नाही. त्यामुळे भारत – अमेरिका मैत्रीच्या या मर्यादा आहेत आणि त्या वेळोवेळी उघड्या पडत असतात. त्यात अमेरिकेची सूत्रे डोनाल्ड ट्रम्प यांच्यासारख्या लहरी व बेमुर्वतखोर सत्ताधीशाकडे सध्या आहेत. त्यामुळे कोणाशी कधी खटका उडेल याची शाश्‍वती राहिलेली नाही. त्यामुळे मैत्रीचे पोवाडे गाताना या मर्यादाही डोळ्यांपुढे ठेवणेच इष्ट ठरेल.