मतदानाची टक्केवारी वाढणार

0
147

>> मुख्य निवडणूक अधिकारी कुणाल यांची माहिती

लोकसभा निवडणुकीतील मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात आल्याने मतदानाची टक्केवारी निश्‍चित वाढणार आहे. साधारण ८० टक्के मतदानाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कुणाल (आयएएस) यांनी काल दिली.

लोकसभेच्या वर्ष २००९ च्या निवडणुकीत ५५.२७ टक्के मतदान झाले होते. तर, वर्ष २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत ७६.८६ टक्के मतदान झाले होते. गोवा विधानसभेच्या २०१७ च्या निवडणुकीत ७८.८८ टक्के मतदान झाले होते. या लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी विविध उपक्रमाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली आहे, अशी माहिती कुणाल यांनी दिली.
राज्यातील मतदारांमध्ये मतदानाविषयी जागृतीसाठी ३६ आयकॉन यांची नियुक्ती करण्यात आली. यात विविध क्षेत्रात मान्यवर आणि कलाकारांचा समावेश आहे. मतदानाविषयी जागृतीसाठी जिंगल, गीते, कातार, भजन व इतर प्रकारच्या गाण्याची रचना करण्यात आली. शिमगोत्सवातून मतदानाबाबत जागृती करण्यात आली. व्हिंटेज कार रॅलीच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. फॅशन शो, कातार स्पर्धा, सेल्फी स्पर्धा, चारोळी स्पर्धा घेण्यात आल्या. खासगी बसगाड्या, कदंब बसगाड्यांमध्ये मतदानाबाबत जागृती करणारे स्टिकर्स लावण्यात आले. कदंब बसस्थानकावर स्टिकर्स लावण्यात आले. गोवा डेअरीने दुधाच्या पाकिटावर मतदानाबाबत जागृती करणारा स्टिकर प्रसिद्ध केला. तसेच मतदानाच्या जागृतीसाठी पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे, असेही कुणाल यांनी सांगितले.
लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतलेल्या नागरिकांची भेट घेऊन त्यांना मतदानाचे महत्त्व पटवून देऊन मतदान करण्यास प्रवृत्त करण्यात आले आहेत. दिव्यांग मतदारांना मतदानासाठी प्रोत्साहन देण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात आले आहेत. सरकारी कर्मचारी आणि दिव्यांग मतदारांना मतदानाबाबत खास प्रशिक्षण देण्यात आले आहे. मतदानाचे महत्त्व विशद करणारे व्हिडिओ तयार करून प्रसारित केले जात आहेत, असे कुणाल यांनी सांगितले.