मजुरांसाठी आज थिवीहून रेल्वे सुटणार

0
192

>> मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली शक्यता

राज्यात अडकून पडलेल्या मजुरांना त्यांच्या राज्यात परत पोचविण्यासाठी खास रेल्वेगाडी थिवी रेल्वे स्टेशनवरून शुक्रवारी सोडली जाण्याची दाट शक्यता आहे. रेल्वे मंत्रालयाकडून खास रेल्वेगाडीच्या वेळापत्रकाबाबत माहिती मिळविण्याचे काम सुरू आहे. या रेल्वेगाडीबाबत गुरूवारी उशिरापर्यंत माहिती मिळणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना काल दिली.

उत्तर आणि दक्षिण गोवा जिल्हा प्रशासनाकडून परराज्यात जाण्यासाठी नोंदणी केलेल्या मध्यप्रदेश, बिहार आदी राज्यांतील मजुरांना म्हापसा येथील पेडे स्टेडियममध्ये पाठविले जात आहेत.

गोवा विमानतळ खुला करण्याची मागणी
विदेशातून येणार्‍या गोमंतकीय नागरिकांच्या सोयीसाठी गोवा विमानतळ खुला करण्याची विनंती केंद्रीय गृहमंत्रालय, केंद्रीय विदेश मंत्रालयाकडे करण्यात आली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी दिली.

राज्याचा हरित विभागात समावेश असल्याने सरकारी व खासगी विविध कामांना सुरुवात झाली आहे. त्यामुळे मजुरांना काम मिळू शकते. आम्हांला मजुरांना परत पाठविण्याची घाई नाही. मजुरांनी येथे राहून काम करावे. मजुरांच्या घरवापसीमुळे विविध प्रकारच्या विकासकामांवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे मजुरांचे मतपरिवर्तन करण्याची गरज आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.
राज्य प्रशासनाने देशातील विविध भागात अडकून पडलेल्या १६८ गोमंतकीयांना खास बसगाड्यांतून राज्यात आज आणले आहेत. विविध राज्यात अडकून पडलेल्या गोमंतकीयांना आणण्याचे काम सुरूच राहणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी दिली.
मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी एकमेकांवर आरोप- प्रत्यारोप करणार्‍या उपमुख्यमंत्री मनोहर आजगावकर आणि बंदर कप्तानमंत्री मायकल लोबो यांच्याशी काल चर्चा करून दोघांतील वाद मिटविण्याची सूचना केली.

दक्षिण गोवा जिल्हाधिकारी मध्यप्रदेशात जाणास इच्छुक असलेल्या मजुरांच्या प्रश्‍नाबाबत मध्यप्रदेश प्रशासनाच्या संपर्कात आहेत. कर्नाटकात जाण्यास इच्छुक असलेल्या मजुरांना आधारकार्ड नसल्याने नोंदणीसाठी अडचण येत आहे. दक्षिण गोव्यातील निवारा केंद्रात असलेल्या कर्नाटकातील मजुरांकडे आधारकार्ड नाहीत, असे आढळून आले आहे.

प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेखालील मंजूर धान्य न उचललेल्या तीन स्वस्त धान्य दुकान मालकांवर कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती नागरी पुरवठा खात्याच्या सचिवांनी राज्य कार्यकारी समितीच्या बैठकीत दिली आहे.
राज्यातील कोविड चाचण्यांच्या तपासणीला गती देण्यासाठी आणखी कर्मचार्‍यांना कोविड तपासणीचे प्रशिक्षण देण्याची गरज आहे, अशी माहिती आरोग्य सचिवांनी दिली.

पत्रादेवी पेडणे येथील मुख्य तपासणी नाक्यावरील वाहन प्रवेश प्रक्रियेत सुसूत्रता आणण्याची सूचना उत्तर गोवा जिल्हाधिकार्‍यांना करण्यात आली आहे. राज्यात प्रवेश करणार्‍या वाहन चालकांना तपासणी नाक्यावर जास्त वेळ ताटकळत राहावे लागत आहे.
बार्ज मालक संघटनेने बार्जवरील कर्मचार्‍यांच्या कोविड तपासणीचे शुल्क देण्याची तयारी दर्शविली आहे. तथापि, बार्ज कर्मचार्‍यांचा १४ दिवसांचा क्वारंटाईन बार्जवर करण्यास मान्यता देण्याची मागणी केली आहे.

परराज्यात जाणार्‍या ७५०
मजुरांची यादी तयार
दक्षिण गोवा जिल्हाधिकार्‍यांनी परराज्यात जाण्यास इच्छुक असलेल्या ७५० मजुरांची एक यादी तयार केली असून पहिल्या खास रेल्वेगाडीतून या मजुरांना परत पाठविण्यासाठी रेल्वे प्रशासनाशी बोलणी सुरू आहेत, अशी माहिती राज्य कार्यकारी समितीच्या बैठकीत देण्यात आली.