Home बातम्या मगो-कॉंग्रेस युतीची बोलणी संपुष्टात

मगो-कॉंग्रेस युतीची बोलणी संपुष्टात

0

सर्वांत भ्रष्टाचारी कॉंग्रेस पक्षाकडे सरकार स्थापन करण्यासाठी युती का केली होती? आता निवडणुकीच्यावेळी मतदारांनी प्रश्‍न विचारल्यास काय उत्तर देणार, असे प्रश्‍न करून पत्रकारांनी ढवळीकर यांना बरेच छेडले. त्यावर सरकार स्थापन करण्यासाठी पाठिंबा दिला नसता तर राष्ट्रपती राजवट लागू झाली असती, ते टाळण्यासाठीच कॉंग्रेससोबत सरकार स्थापन केल्याचे ढवळीकर यांनी सांगितले. भाजप व आपल्या पक्षाची विचारप्रणाली मिळतीजुळती असल्याचे ते म्हणाले.

इंग्रजी प्राथमिक शाळांना अनुदान देण्याचा कामत सरकारचा निर्णय आम्हाला मान्य नव्हता, असे ढवळीकर यांनी सांगताच तसे होते तर सरकारचा पाठिंबा त्याच क्षणी का काढून घेतला नाही, असा प्रश्‍न केला असता, वरील निर्णयाची अंमलबजावणी झालेली नाही, असे ते म्हणाले.

युतीसाठी भाजपकडे दहा जागांची मागणी केली आहे. या आठवड्यात युतीचा अधिकृत निर्णय होऊ शकेल, असे ते म्हणाले. केपे, प्रियोळ, मडकई, फोंडा, दाबोळी, सावर्डे, मये, पर्वरी, थिवी व सांताक्रुज असे दहा मतदारसंघ मगोला सोडण्याचा प्रस्ताव भाजपला दिल्याचे त्यांनी सांगितले. वरील प्रस्तावावर निर्णय घेण्यासाठी भाजपला एका आठवड्याची मुदत दिल्याचे त्यांनी सांगितले.

युती फिस्कटल्याने कॉंग्रेस नेते हवालदिल

शर्थीचे प्रयत्न सुरू

पाच वर्षे कॉंग्रेसबरोबर सत्ता उपभोगल्यानंतर कॉंग्रेस हा सर्वांत भ्रष्टाचारी पक्ष असल्याच्या मगो अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी केलेल्या आरोपामुळे कॉंग्रेस पक्षात खळबळ निर्माण झाली असून पक्षाच्या काही नेत्यांनी आपल्या पक्षश्रेष्ठींनाही यासंबंधीची माहिती कळविली आहे. मगो-भाजप युती होण्याची शक्यता वाढल्याने कॉंग्रेस नेत्यांसमोर संकट उभे ठाकले आहे. त्यामुळे मगो-भाजप युती होऊ नये म्हणून त्यांचे निर्वाणीचे प्रयत्न चालू आहेत. मगो-भाजप युती झाल्यास कॉंग्रेस सरकार स्थापन होण्याची शक्यता कमी असल्याचे काही नेत्यांना वाटते. कॉंग्रेसच्या उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्या काही उमेदवारांची स्थिती कठीण झाली असून त्यांना या परिस्थितीत कोणता निर्णय घेऊ हा प्रश्‍न निर्माण झाला आहे. राजकीय वातावरण गढूळ झाल्याने कॉंग्रेस नेत्यांनी पक्षाचा विचार न करता आपण कसे निवडून येऊ, यावरच अधिक लक्ष केंद्रित केल्याचे कळते.

मुख्यमंत्र्यांचे माजी स्वीय सचिव मगो पक्षात डेरेदाखल

मुख्यमंत्री दिगंबर कामत यांचे खासगी सचिव प्रकाश अर्जुन वेळीप व दाबोळी मतदारसंघातील प्रताप म्हार्दोळकर यांनी काल मगो पक्षात प्रवेश केला. वेळीप व म्हार्दोळकर हे दोन्ही इच्छुक उमेदवार असून वेळीप हे केपे मतदारसंघातून तर म्हार्दोळकर हे दाबोळी मतदारसंघातून निवडणूक लढवतील. भाजपबरोबर युती न झाल्यास स्वबळावर निवडणूक लढविण्याची तयारी आहे. त्यासाठी १६ उमेदवार तयार असल्याचे मगो अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी सांगितले. मगो पक्षात प्रवेश करतेवेळी वेळीप यांचे सुमारे २०० कार्यकर्ते मगो कार्यालयाबाहेर उभे होते. आपण यापूर्वी कोणत्या पक्षात होता, असे वेळीप यांना विचारले असता २००२ साली आपण भाजपमध्ये होतो, परंतु दरम्यानच्या काळात सदस्यत्वासाठी नूतनीकरण न केल्याने सदस्यत्व रद्द झाले, असे वेळीप यांनी सांगितले.