मगोवर दुटप्पीपणाचा आरोप करणारा भाजपच विश्वासघातकी : वेलिंगकर

0
89

भारतीय भाषा सुरक्षा मंचाच्या आंदोलनाला पाठिंबा व्यक्त करणार्‍या मगो पक्षाच्या तथाकथित दुटप्पीपणावर टीका करण्याचा अधिकार अनुदान बंद करण्याचे आश्वासने देऊन, भाषा आंदोलना सहभागी होऊन पूर्ण बहुमताने सत्तेवर आलेल्या, परंतु राजकीय स्वार्थापोटी व अल्पसंख्यकांच्या लांगूलचालनापोटी विश्वासघात करणार्‍या भाजपाला कोणी दिला, असा सवाल भाभासुमंचे समन्वयक सुभाष वेलिंगकर यांनी पत्रकाद्वारे केला आहे.

दिगंबर कामत सरकारमध्ये मगोचे दोन आमदार होते. त्यांनी प्रारंभी अनुदानाला विरोध केला होता, मात्र त्यांनी सरकारचा त्याग केला नाही असे वेलिंगकर यांनी पत्रकात नमूद केले आहे. मगोचे धोरण दुटप्पी आहे असे वाटत होते, तर भाजपाने त्यांच्याशी युती का केली, असा सवालही वेलिंगकरांनी विचारला आहे. मातृभाषा रक्षणाच्या आश्वासनाशी द्रोह करून भाजपाने भाभासुमंच्या आंदोलनावर बहिष्कार घालायला कार्यकर्त्यांना भाग पाडले, आंदोलनाची अवहेलना केली, आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला यात कोणती नैतिकता आली, असा सवालही वेलिंगकर यांनी केला आहे.
२०१२ च्या निवडणुकीपूर्वीचे भाजपाचे धोरण व सत्तेवर आल्यानंतरचे धोरण हा दुटप्पीपणा नाही का, असेही वेलिंगकर यांनी विचारले आहे. भाभासुमंचे आंदोलन आता जनआंदोलन बनत असून कोणताही राजकीय पक्ष ते थोपवू शकणार नाही असा इशाराही वेलिंगकर यांनी दिला आहे.