मगोला युती हवी असेल तर थेट चर्चा करावी : भाजप

0
102

जिल्हा पंचायत निवडणूक
येऊ घातलेल्या जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी जर मगो पक्षाला भाजपशी युती करायची असेल तर मगोच्या नेत्यांनी भाजपला पत्रे पाठवायची सोडून थेट चर्चेसाठी यावे, असे भाजपचे दक्षिण जिल्हा अध्यक्ष व आमदार सुभाष फळदेसाई यांनी काल पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.मगोच्या नेत्यांनी वरील युतीसाठी भाजपच्या नेत्यांशी चर्चा करायची सोडून नेत्यांना एक पत्र पाठवले व ते पाठवण्यापूर्वीच पत्रकार परिषदही घेतली. त्यांची ही कृती आक्षेपार्ह अशी आहे, असे फळदेसाई म्हणाले. गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने मगोशी युती केली होती. या निवडणुकीत भाजपला पूर्ण बहुमत मिळाले. पण तरीही युतीचा धर्म पाळत भाजपने मगोला मंत्रिपदे तसेच महत्वाची खातीही दिली. या पार्श्‍वभूमीवर मगोने युतीच्या धर्माचे पालन करायला हवे. पत्रे पाठवून युती करता येत नाही हे सांगतानाच मगोसाठी आमची दारे खुली आहेत असे फळदेसाई यावेळी म्हणाले. युती हवी असेल तर मागे नेत्यांना प्रत्यक्ष चर्चेसाठी यावे लागेल. तसेच युतीसाठीच्या नियम व अटींचेही पालन करावे लागेल. हल्लीच झालेल्या पणजी पोटनिवडणुकीच्यावेळी ही निवडणूक भाजपला जड जाईल. नवी दिल्ली येथे झालेल्या निवडणुकीच्या निकालानंतर तर पणजीत भाजपला विजय मिळेल की काय याविषयी प्रश्‍नचिन्ह निर्माण करण्यात आले होते. पण शेवटी अपेक्षेप्रमाणे लोकांनी भाजपला निवडून आणल्याचे फळदेसाई म्हणाले. गोव्याची जनता भाजपमागे भक्कमपणे उभी आहे हे या निकालावरून सिध्द झाल्याचे ते म्हणाले.