मंदार सुर्लकर खून प्रकरणातील आरोपींची ‘ती’ याचिका फेटाळली

0
12

सर्वोच्च न्यायालयाने मंदार सुर्लकर खून प्रकरणातील चार आरोपींची एक याचिका फेटाळून लावली आहे. मंदार सुर्लकर याचा ऑगस्ट २००६ मध्ये खून करण्यात आला होता. या प्रकरणी चार जणांना १४ वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आलेली आहे. आतापर्यंत या खून प्रकरणातील चार आरोपींनी ११ ते १२ वर्षांची शिक्षा पूर्ण केली आहे.

सुरुवातीला मुंबई उच्च न्यायालयात गोवा खंडपीठात आरोपी रोहन धुंगट, नफियाज शेख, शंकर तिवारी आणि जोविटो पिंटो या चौघांनी एक याचिका दाखल केली होती. त्यात त्यांच्या वास्तविक कारावासाच्या १४ वर्षांच्या कालावधीचा विचार करताना पॅरोल कालावधीचा समावेश करून त्यांची तुरुंगातून सुटका करावी, अशी विनंती केली होती. मात्र उच्च न्यायालयाने ऑगस्ट २०२२ मध्ये ही याचिका फेटाळून लावली होती. १४ वर्षांच्या कालावधीमध्ये पॅरोल, फर्लो इत्यादी माफीचा कालावधी समाविष्ट होऊ शकत नाही, असे न्यायालयाने म्हटले होते.

उच्च न्यायालयाच्या या आदेशाला चार आरोपींनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळताना निदर्शनास आणून दिले की, अशा याचिका स्वीकारल्या गेल्या, तर ते एक चुकीचे उदाहरण ठरणार आहे. कैद्यांना अनेक वेळा पॅरोल मिळाला आणि तो कालावधी शिक्षेतून वगळला गेला, तर तो वास्तविक कारावासाचा उद्देश नष्ट करेल.