मंत्रिमंडळ फेरबदलाच्या चर्चांना पुन्हा उधाण

0
1

>> मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्यामुळे फेरबदलाची शक्यता बळावली; भाजपचे ज्येष्ठ नेते-केंद्रीय मंत्र्यांच्या भेटीगाठींचा धडाका

देशातील दोन राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम संपल्यानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी तातडीने नवी दिल्लीला धाव घेतल्याने राज्यात मंत्रिमंडळातील फेरबदलाच्या विषयावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळातील फेरबदलाची शक्यता तूर्त फेटाळली आहे. महाराष्ट्र राज्यात भाजपचे सरकार स्थापन करण्यात केंद्रीय पातळीवरील नेते मंडळी व्यस्त आहेत, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्र व झारखंड राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय नेत्यांकडून गोव्याच्या मंत्रिमंडळातील फेरबदल लांबणीवर टाकण्यात आला होता. आता, दोन्ही राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर गोवा मंत्रिमंडळात फेरबदलाच्या चर्चा रंगल्या आहेत.

मंत्रिमंडळ फेरबदलाविषयी चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे आपल्या दिल्ली दौऱ्यात भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय काही केंद्रीय मंत्र्यांची भेट घेण्याची शक्यता आहे. राज्यातील मंत्रिमंडळातील फेरबदल गेल्या काही महिन्यांपासून रखडलेला आहे. त्यामुळे डॉ. प्रमोद सावंत यांनी नवी दिल्लीला धाव घेतल्याने मंत्रिमंडळातील फेरबदलाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. मंत्रिमंडळातील काही मंत्र्यांना वगळून नवीन मंत्र्यांचा समावेश करण्याचा प्रस्ताव आहे. काँग्रेसमधून फुटून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या काही आमदारांना मंत्रिपद दिले जाण्याची शक्यता आहे. याशिवाय सभापती रमेश तवडकर यांच्याकडून सुध्दा मंत्रिपद मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. दुसऱ्या बाजूला काही विद्यमान मंत्री आपले मंत्रिपद कायम राखण्यासाठी केंद्रीय पातळीवरील नेत्यांच्या माध्यमातून वजन वाढविण्याचा प्रयत्न करीत आहेत.

इको सेन्सिटिव्ह झोनबाबत चर्चा
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी नवी दिल्ली येथे काल केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनी यादव यांच्याशी गोव्यातील पर्यावरण संवेदनशील क्षेत्र (ईएसझेड), किनारी विभाग व्यवस्थापन आराखडा या विषयावर चर्चा केलेी. गोव्यातील काही गावे इको सेन्सिटिव्ह झोनमधून वगळण्याची विनंती केंद्रीय पर्यावरणमंत्र्यांकडे करण्यात आली आहे. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने नियुक्त केलेली तज्ज्ञ समिती मंगळवार 26 नोव्हेंबरला गोव्यात येणार आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ह्या भेटीनंतर सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये नमूद केले आहे.

‘एमपीटी’ संबंधित मुद््‌‍द्यांवर चर्चा
यानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्गमंत्री सर्बानंद सोनोवाल यांचीही काल भेट घेतली. सोनोवाल यांच्याशी मुरगाव पोर्ट ट्रस्टशी संबंधित महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली. तसेच, ऐतिहासिक व्हाईसरेगल पॅलेसचे अवशेष गोवा सरकारच्या पुरातत्त्व विभागाकडे हस्तांतरित करण्याच्या प्रक्रियेला गती देण्याची विनंती केली. अवशेष हस्तांतरणामुळे या ऐतिहासिकदृष्ट्‌‍या महत्त्वपूर्ण स्थळाचा जीर्णोद्धार आणि जतन करणे सुलभ होईल आणि भविष्यातील पिढ्यांसाठी तिचे संरक्षण सुनिश्चित होईल. मुरगाव बंदरातील आयात आणि निर्यात वाढविण्याचा आराखडा तयार करण्याची विनंती करण्यात आली आहे, असे मुख्यमंत्र्यांनी ह्या भेटीनंतर सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये नमूद केले आहे.
मुख्यमंत्र्यांनी घेतले

लालकृष्ण अडवाणींचे आशीर्वाद
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी भारताचे माजी उपपंतप्रधान, भारतरत्न लालकृष्ण अडवाणी यांची काल नवी दिल्ली येथील त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. अडवाणीजींचे नेतृत्व आणि अतुलनीय संघटनात्मक कौशल्ये सर्वांसाठी मार्गदर्शक आहेत. असंख्य कार्यकर्त्यांना सार्वजनिक सेवेसाठी आणि आपल्या देशाच्या उन्नतीसाठी स्वतःला समर्पित करण्यासाठी ते प्रेरणा देत आहेत, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.