मंगलोर भीषण अपघातात पर्वरी येथील वकील ठार

0
149

>> तिघे सहकारी गंभीर जखमी

शुक्रवारी सकाळी मेंगलोर येथे झालेल्या एका बस व चारचाकी गाडीच्या भीषण अपघातात पर्वरी येथील राज नदाफ हा तरूण वकील जागीच ठार झाला. तर त्याचे मित्र परेश सावंत, रक्षित नाईक व वामन गांवकर हे गंभीररित्या जखमी झालेले असून त्यांच्यावर मेंगलोर येथील ए. जे. इस्पितळात उपचार चालू आहेत. वरील चौघे मित्र शुक्रवारी सुटी व नंतर शनिवार, रविवारी सरत्या आठवड्याची सुटी असल्याने कुर्ग येथे फिरायला जात असताना मंगलोर येथे हा अपघात घडल्याचे वृत्त आहे. ते ज्या कारने प्रवास करीत होते त्या गाडीला एका बसने मागून जोरदार धडक दिल्याने हा भीषण अपघात झाल्याचे समजते. ही धडक एवढी जबरदस्त होती की कारच्या मागच्या बाजूचा चक्काचूर झाला. त्यात राज नदाफ याचा जागीच मृत्यू झाला. तर परेश सावंत, रक्षित नाईक व वामन गावकर हे गंभीररित्या जखमी झाले. कुटुंबीयांना अपघाताची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी मंगलोरला धाव घेतली. मयत राज नदाफ हा एक उभरता वकील होता, असे सूत्रांनी सांगितले.