भोपाळ गॅस दुर्घटनेतील प्रमुख आरोपीचेे निधन

0
311

कोणतीही कारवाई झाली नसल्याबद्दल खेद व्यक्त
१९८४ मध्ये भोपाळमधील महाभयानक गॅस दुर्घटनेस जबाबदार असलेल्या यूनियन कार्बाइड कंपनीचा मुख्य कार्यकारी अधिकारी व प्रमुख आरोपी वॉरन अँडरसन याचे वयाच्या ९२व्या वर्षी फ्लोरिडा येथे निधन झाले. त्याच्या निधनानंतर सुमारे २९ दिवसांनी ही माहिती न्यू यॉर्क टाइम्सने शुक्रवारी प्रसिद्ध केली आहे. त्याच्या परिवारजनांनी ही माहिती गुप्त ठेवली होती. ३० वर्षांपूर्वी झालेल्या भयानक दुर्घटनेत हजारो भारतीय ठार झाले होते.दरम्यान, त्याच्या मृत्यूची बातमी समजताच भोपाळमधील गॅस दुर्घटना पीडितांच्या हक्कांसाठी लढणार्‍या कार्यकर्त्यांनी अँडरसनचा मृत्यू त्याच्यावर कोणतीही कारवाई न होताच झाला याबद्दल खेद व्यक्त केला व कारवाईस भारत-अमेरिका सरकार अपयशी ठरल्याची टीका केली. अमेरिकेने त्याला भारताच्या हवाली केले नाही, असेही या कार्यकर्त्यांचे म्हणणे होते. अमेरिकेकडून संरक्षण व भारताचा बेजबाबदारपणा यामुळे त्याचा न्याय होऊ शकला नाही, असे भोपाल ग्रुप फॉर इन्फॉरमेशन अँड ऍक्शन संघटनेच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.
२-३ डिसेंबर १९८४च्या रात्री कंपनीच्या कीटनाशक प्रकल्पातून विषारी वायूची गळती होऊन अपघात घडल्यानंतर चार दिवसांनी अँडरसन भोपाळला आला होता. मात्र नंतर जामीन घेऊन तो भारताबाहेर पसार झाला व पुन्हा परतलाच नाही. नंतर काही वर्षांनी त्याला फरारी घोषित करून वॉरंट बजावण्यात आले होते. मात्र तो शेवटपर्यंत सापडू शकला नाही. सीबीआयच्या दुर्घटनेसंबंधी आरोपपत्रात अँडरसन क्रमांक १ चा आरोप होता.
या दुर्घटनेत सुमारे ३ हजार लोक तात्काळ मरण पावले होते तर वायूच्या संपर्कात आलेल्या अनेकांचा नंतर मृत्यू झाला होता. शेकडोजणांना कॅन्सर जडला, अनेकांचे डोळे गेले, किडनी निकामी झाली, शिवाय इतर व्याधींनीही अनेकजण ग्रस्त बनले होते. कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार या दुर्घटनेतील एकुण मृत्यूंची संख्या ३५ हजारच्या घरात आहे.