भेटी लागी जीवा…

0
436

उदयबुवा फडके

पंढरपूरलाखो भाविकांचे श्रद्धास्थानसंतांचे तर माहेरच. नाथ महाराज म्हणतात– ‘माझे माहेर पंढरी, आहे भिवरेच्या तीरी…’ आषाढी आणि कार्तिकीला तर जनसागर लोटतो त्या पंढरपुरात.

असं काय आहे त्या स्थळाचं महत्त्व? संतांच्या कल्पनेला बहर येणारी ही भूमीवर्णन करावं तेवढं थोडंच. संत म्हणतात, ‘पंढरी सोन्याची नगरी आहे चंद्रभागे तीरी. संतकवींच्या कल्पनेला जो बहर येतो, तो पाहिला तर ही पंढरी खरोखरच तशी आहे असं वाटणं साहजिक आहे. पण संतांच्या कल्पना आणि प्रत्यक्ष स्थिती यात बराच फरक आहे. आषाढी आणि कार्तिकी एकादशीला तर या शहरासारखं गलिच्छ, अस्वच्छ शहर जगात क्वचितच असेल असं वाटू लागतं. त्याचं कारण, लक्षावधी भाविक यात्रेकरू आणि कितीही व्यवस्था केली तरी अपुरी पडणारी नगरपालिका. पण असं असूनही लाखो लोक इथं येतात. दोनदोनतीनतीन दिवस रांगेत उभं राहून त्याचं दर्शन घेऊन पावन झाल्याचं समाधान अनुभवतात. तो इटू, विठोबा, विठ्ठल, पांडुरंग, माउली भेटल्याचा आनंद घेऊन तृप्त मनानं घरी परततात. त्याचं दर्शन जो घेतो तो वेडाच होतो. ते वेड वेगळेच. हे वेड ज्याला लागते तो त्या धुंदीतच जगत असतो. हे विठ्ठलाच्या भेटीचे लागलेले पिसे. ‘विसरलो कैसे देहभानअसे तो म्हणतो.

आषाढीला गर्दी जास्त असते. चंद्रभागा दुथडी भरून वाहत असते. विठ्ठलाच्या दर्शनासाठी जनसागर लोटतो. वारकरी संप्रदायाने भागवत धर्माची पताका सगळीकडे रोवली. दिंडी हा प्रकार म्हणजे जणू भक्तीमेळावा. पालखी हे या मेळाव्याचे सामाजिक स्वरूप. ज्ञानेश्‍वर माउली आणि तुकोबा यांच्या पालख्या जेव्हा देहू व आळंदीतून निघतात तेव्हा लाखोंच्या संख्येने वारकरी, टाळकरी, माळकरी त्या दिंड्यांसोबत येत असतात. जात, पंथ, भेद यांच्यापलीकडे असलेल्या या वारीतून एक संदेश सर्वदूर पसरवला जातो तो म्हणजे समानतेचा.

ज्ञानदेवांच्या काळात तर संतमंडळीने ही वेगळी जाणीव समाजाला करून दिली. सगळी संतमंडळी एकत्र आली. त्यांनी जात, धर्म, पंथविरहित समाजाची संकल्पना लोकांसाठी कृतीत आणून दाखवली. गोराकुंभार, नरहरी सोनार, ज्ञानेश्‍वर, निवृत्ती, सोपान, मुक्ताबाई ही ब्राह्मणांची मुले. नामदेव शिंपी, चोखा महार हे सगळे एकत्र बसत, जेवण करत. त्यानंतरच्या काळात एकनाथ, गिरोबा, राकाकुंभार असे संत तोच विचार पुढे चालवू लागले. नामदेवज्ञानेश्‍वरांनी तर सगळीकडे प्रवास करून भागवत धर्माची ही पताका अटकेपार नेली. दांभिकपणा मोडून काढण्यासाठी काही वेळा चमत्कारही करून दाखवले. जनसामान्यांना गीता समजावी म्हणून ज्ञानेश्‍वरांनी ती मराठीत आणली, तर भागवत धर्म समजावा म्हणून नामदेवांनी अगदी पार पंजाबपर्यंत प्रवास करून त्यांच्या भाषेत त्यांना तो समजावला. आजही आपण ग्रंथसाहेबहा शीख लोकांचा धर्मग्रंथ पाहिला तर नामदेवमहाराजांचे किमान ७२ अभंग आपणाला सापडतील.

विविध संतांच्या पालख्या त्यांच्यात्यांच्या समाधीस्थानावरून निघतात, तर इतर दिंड्या त्यांच्यात्यांच्या गावातून निघतात. पायी वारी हा खरं तर भक्तिमार्गातला ज्ञानयज्ञच असतो. विठ्ठलाचा नामगजर, संतांच्या अभंगांचे नित्यस्मरण, भजन, प्रवचन, कीर्तन हे सर्व कार्यक्रम करीत या दिंड्या विठुरायाच्या पंढरीत जमा होतात. चंद्रभागेत स्नान करून मुखदर्शन किंवा कळसदर्शन घेतात. त्याच्या पायी व्रतधर्म पाळीनअशी आण घेतात. तुळशीच्या माळा, बुका, खांद्यावर पताका, हातात टाळ अशा अलौकिक थाटात ते एकादशीचा उपवास करून घरी परततात. काल्याच्या महाप्रसादाने या वारीची सांगता होते. असा हा उत्सव गेली आठदहा शतके अव्याहतपणे चालू आहे.

या पांडुरंगाला म्हणे पुंडलिकाने पंढरीत आणले. पांडुरंग म्हणजे परब्रह्म. स्वर्गीचा श्रीमहाविष्णू. पण तो आपले देवपण विसरून या पुंडलिकासाठी भूलोकीच्या या वैकुंठ असलेल्या पंढरीत पुंडलिकाच्या प्रतीक्षेत विटेवर कंबरेवर हात धरून उभा राहिला. जेव्हा विठुराया दारात आला तेव्हा पुंडलिक आपल्या मातापित्यांच्या सेवेत गुंतला होता. त्याने वीट फेकली आणि म्हणाला, ‘विठ्ठला आलासी माझ्या दारी, पण थांब जरासा विटेवरी!’ या विटेवर उभा रहा मी येईपर्यंत. आत्ता येतो असे सांगून पुंडलिक त्या नदीच्या पात्रात शिरला आणि त्याने आपला देहच समर्पित करून टाकला. हा विठू मात्र याची वाट पाहत तिथेच उभा राहिला!

जनाबाईने या प्रसंगाचे वर्णन करताना असे म्हटले आहे की, ‘पुंडलिक भक्त बळी, विठो आणिला भूतळी.’ भक्तीसाठी त्याने स्वतःचा बळी दिला. तुकाराम महाराजांनीसुद्धा याविषयी लिहिताना असे म्हटले आहे की– ‘वैकुंठीचा देव आणला भूतला, धन्य तो आगळा पुंडलिक.’ त्याच्या (पुंडलिकाच्या) आगळेवेगळेपणाचे वैशिष्ट्य म्हणजे, त्याने कृतीद्वारे हे दाखवून दिले की मातापित्यांची सेवा ही देवाच्या भेटीपेक्षाही महत्त्वाची आहे. आईवडिलांच्या सेवेसाठी त्याने विठुरायालाही दूर सारले. खरं म्हणजे देव ही संकल्पना निर्गुणी, निराकार; परंतु सगुण साकार रूपामध्ये त्याला विटेवर उभा करून, स्वतः देह त्याग करून त्याने संपूर्ण जगतातल्या भक्तांची फार मोठी सोय करून ठेवली. पंढरीला महाक्षेत्र म्हणून ख्यातीकीर्ती मिळवून दिली.

तो पंढरीचा पांडुरंग आपली तहानभूक हरपून टाकतो. भाविकांना तो सुंदर ते ध्यान उभे विटेवरीवाटते. तुकोबारायांची ही अनुभूती आहे. त्याचे ध्यान पाहून ज्ञानेश्‍वर माउलीला रूप पाहता लोचनी, सुख झाले हो साजणीअसे वाटू लागते. ज्यांनी तो संतमार्ग, भक्तिमार्ग ओळखला, ते लाखो भाविक विठ्ठल भेटीसाठी मोठ्या प्रेमाने, ओढीने, आत्मीयतेने, आनंदाने जयघोष करीत पंढरीकडे मार्गस्थ होतात. त्यात उच्चनीचता नसते. शिक्षण, पद, हुद्दा या सगळ्या गोष्टी फजूल वाटू लागतात. त्याच्या भेटीला जाणारा प्रत्येक फक्त त्याचा भक्त हा एकच धागा धरून आलेला असतो. पंढरीत येताना होणार्‍या कष्टांची त्याला तमा नसते. पायाला सुज येते, फोड येतात. उन्हामुळे काही वेळा तो उष्माघाताने आजारी पडतो. शारीरिक पिडा, यातना होत असतात. या प्रवासात भोजन व्यवस्थित मिळेल याची खात्री नसते. रहायची किंवा नैसर्गिक विधींची सोय होईलच असे निश्‍चित सांगता येत नाही. काही ठिकाणी तर त्याला दोनदोन दिवस आंघोळीसाठी पाणीही मिळत नाही. पण त्याची त्याला तमा नसते. तो फक्त विठ्ठलाचे भेटीचे लागलेसे पिसे, विसरलो कैसे देहभान…’ अशा अवस्थेत पोचलेला असतो. त्याच्या स्वत्वाचा त्याला विसर पडलेला असतो. तो एका वेगळ्याच विश्‍वात रममाण झालेला असतो.

सर्वसामान्यपणे माहेरी सुख आणि सासरी दुःख असे प्रापंचिक जीवनाचे गणित आहे. संत संसाराला सासर मानतात आणि परमार्थाला माहेर. त्यामुळे पारमार्थिक भाग जेथे अनुभवायला मिळतो, त्या पंढरीला नाथमहाराज म्हणतात– ‘माझे माहेर पंढरी, आहे भीवरेच्या तीरी.’ हा अनुभव फक्त नाथमहाराजांनाच आला असं नाही. तुकाराम महाराजही म्हणतात, ‘शीतल हा पंथ, माहेरची वाट, जवळीच नीट सुखरूप.’ बहुतेक संतांना सर्व तीर्थक्षेत्रांत पंढरपूर हे महातीर्थक्षेत्र आहे असे वाटते. त्याची सर अन्य कुठल्याही तीर्थक्षेत्राला येणार नाही अशी त्यांची भावना. त्याचे कारण म्हणजे, आषाढीकार्तिकेला वार्‍या येतात, पालख्या येतात, दिंड्या येतात, संतमेळा जमतो, काला होतो. इतकी आध्यात्मिक एकता आणि सामाजिक समता अन्य कुठल्याही तीर्थक्षेत्रात दिसत नाही. म्हणून संतकवी म्हणतात, ‘अनुपम्य भाग्य नांदते पंढरी, विट्ठल निर्धारी उभा जेथे.’ या क्षेत्राचा महिमा वर्णन करताना ते म्हणतात, ‘बहुदा काळाचे हे क्षेत्र, सकळ देवांचे माहेर, सकळ संतांचे निज मंदिर, ते पंढरपूर जाणावे| धन्य पंढरीचा महिमा, नाही आणिक उपमा, जेथे वास पुरूषोत्तमा, रूक्मिणीसहीत| रूक्मिणीसहित सर्वदा, धन्य धन्य पुंडलीक, सकल संतांचा नायक, एका जनार्दनी देख, श्री विठ्ठला आवडी|’ माहेर हे विश्रांतीस्थान असते. तिथे विसावल्यावर समाधान प्राप्त होते. सासरहून माहेरी आलेली मुलगी जसे तिकडचे सगळे सुखदुःख आपल्या आईच्या कानात सांगते, तसे भाविकजन जणू आपण माहेरी आल्यागत आपली आर्त वाणी विठूरायाच्या कानी घालतात. ‘देवा सांगू सुख दुःख, देव निवारील दुःखअशी त्यांची भावना. सर्वसामान्यपणे आपल्या मनात असलेल्या विचारांना जेव्हा प्रगटीकरणाचा लाभ मिळतो, तेव्हा मन हलके हलके व्हायला लागते. कुठेतरी दुःख, आंतरिक भावना व्यक्त झाल्याशिवाय चैन पडत नाही.

विठुरायाच्या दरबारामध्ये येणारा भक्त आपल्या मनातलं दुःख, वेदना, पिडा या विठुरायाला सांगून आपला भार हलका करत असतो. भावना अशी की, विठू हा माझ्या माहेरचा माणूस आणि तो मला माझ्या प्रापंचिक कटकटींतून मुक्त करेल. एकदा त्याच्यासमोर आपल्या मनातील मळमळ ओकली की तो भक्त कृतार्थ मनाने पुन्हा आपल्या नेहमीच्या व्यवसायाकडे नव्या जोमाने कार्यरत होतो. म्हणूनच तर संत म्हणतात– ‘तरीच यावे जन्मा, ठेवी पांडुरंगी प्रेमा, नाही तर श्‍वानसुकर, जन्मा आले ते अपार, जेणे पंढरीची वारी, जन्मा आला तो भिकारी.’ जन्माला आलेल्या प्रत्येक माणसाने किमान एकदा तरी पंढरीची वारी करावी, म्हणजे जीवनाचे सार्थक होते असे संत म्हणतात. ‘पंढरीसी जारे, आल्यानो संसारा, दीनांचा सोयरा पांडुरंग|’ अशा पंढरीमध्ये नामयज्ञ चाललेला असतो. नामाचा बाजारच येथे भरलेला असतो. मात्र बाजारीकरण इथे नसते. सात्विकत्त्व, समजुतदारपणा या गोष्टी शिकण्यासाठी आपणाला ही नामाची मात्रा उपयोगी पडते. स्वतःचा अहंकार, अहंपणा, मीपणा या सगळ्या गोष्टी भक्त येथे विरून जातात. आणि ती चंद्रभागा त्या भक्ताला मुक्त करून नवचैतन्याची जाणीव करून देते. एकदा भक्त म्हणून घेण्याची तयारी माणसाने केली की त्याच्या मनातील द्वेषभावना हळूहळू नाहीशी होते. लोकांबद्दलची आपुलकी जागृत होऊ लागते. संत नरसिंह मेहताने तर संतपणाची व्याख्या किंवा वैष्णव कोणाला म्हणावा याबद्दलची व्याख्या करताना म्हटले आहे की, ‘वैष्णव जण तो तेणे कहिये, जो पिड पराई जाणे रे, परदुःखे उपकार करे तोहे, मणा भिमाणा जाणे रे|’ जो दुसर्‍यांची दुःखे, दुसर्‍याची पिडा जाणतो, त्यालाच खरा वैष्णव व भक्त म्हणावा. अशा सगळ्या गोष्टींची अनुभूती येण्यासाठी पंढरीच्या वारीची नितांत आवश्यकता आहे. माणूस म्हटला की मतमतांतरे, हेवेदावे हे येणारच; परंतु त्याही पलीकडे एक आपलेपणाचे जग आहे, एकतेची परंपरा आहे हे पंढरीच्या वारीतच अनुभवायला मिळते.

वारीला जाऊन आलेल्या कुठल्याही माणसाला विचारले तरी कळेल की एकदा वारीत जाऊन आलेल्या माणसाला पुन्हा वारीला जावे असे वाटू लागते. तेथे गेल्याशिवाय त्याला चैन पडत नाही. त्याच्या मनात एक वेगळीच ओढ निर्माण झालेली असते. गाईचा छोटा बछडा मुक्त झाल्यावर ज्या ओढीने आपल्या मातेकडे धाव घेत जाईल, तद्वत् एकदा वारीत जाऊन आलेला माणूस पुन्हा आषाढी किंवा कार्तिकी जवळ येऊ लागली की मनाची तयारी करायला लागतो. मागच्या वारीचे चित्र त्याच्या डोळ्यांसमोर तरळू लागते. ‘जागृती, स्वप्नी पांडुरंगअशी त्याची अवस्था होऊ लागते आणि त्याच्या कानी मग नामघोषांची गुंजन सुरू होतेपांडुरंग विठ्ठलापंढरीनाथ विठ्ठला…!