भावजईवर कोयत्याने हल्ला करून दिराची आत्महत्या

0
66

तिखाजन-मये येथे काल दुपारी १२ वा. रामदास ठाणेकर या साठ वर्षीय इसमाने आपली भावजय सुमन सत्यवान ठाणेकर (वय ४७) हिच्यावर हल्ला करून मानेवर कोयत्याने गंभीर वार केला व नंतर त्याने आपल्याच घरात गळफास लावून आत्महत्या केली. काही महिन्यांपासून ठाणेकरची मानसिक स्थिती ढासळली होती.
दरम्यान, सुमन ठाणेकर यांना बांबोळी वैद्यकीय इस्पितळात दाखल केल्यानंतर तिची प्रकृती सुधारत आहे. रामदास याचा मृतदेह बांबोळी शवागृहात ठेवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
रामदास याची मानसिक स्थिती बिघडली होती. सकाळपासून तो मोठमोठ्याने ओरडत शिवीगाळ करीत होता. याच दरम्यान सुमन ठाणेकर हिच्यावर त्याने राग काढला. घरातून कोयता घेवून त्याने तिच्यावर वार केला. मानेवर वारामुळे सुमन खाली कोसळल्या. इतक्यात शेजारी घटनास्थळी धावून आल्याने रामदासने तेथून पलायन केले व आपल्या घरात दाराला कडी लावून लपून बसला.
इकडे रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सुमनला शेजारी व घरच्या लोकांनी खासगी वाहनात घालून डिचोली प्राथमिक इस्पितळात नेले. तेथून तिला नंतर बांबोळी येथे गोवा मेडिकल कॉलेज इस्पितळात दाखल केले.
या घटनेची माहिती डिचोली पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. हल्लेखोर यावेळी घरात लपून बसला होता. पोलिसांनी रामदासला दार उघडण्याचाी विनंती केली. पण तो दार उघडायला तयार नव्हता. पोलिसांनी आणखी कुमक मागवली. यावेळी दार उघडले असता रामदासने गळफास लावल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह बांबोळी इस्पितळात उत्तरीय तपासणीसाठी पाठविला. डिचोली पोलीस याप्रकरणी पुढील तपास करीत आहेत.