भाळी चंद्रमा अमृताचा!

0
481
  •  पौर्णिमा केरकर

कोजागिरी… दुधासारखी शुभ्र, सात्विक, संस्कारी. मंदिरात.. गावात तिला आठवले जाते, तिच्यासाठी जागरणं केली जातात. हे फक्त जागं राहणं नसावं, तर ती जागृती असावी मनाची. त्यात सामावलेली असावी ज्ञानप्राप्तीची तळमळ .. रसपान करता यावे तिच्या प्रत्येक रूपाचे. कलेकलेने वाढत चढत जाणारा तो अनुभवता यावा कदंब वृक्षाच्या पर्ण जाळीतून. त्याला मिरवावे डोक्यावर घेऊन, न्याहाळत बसावे त्याचे प्रतिबिंब तळ्यात. हुंगता आला तर वासही हुंगावा. माझा मीपणाच सारा गळून पडावा..

प्रत्येक ऋतूला स्वतःचे असे एक आगळेवेगळे लावण्य असते. ऋतुचक्रात होणारा बदल, हा फक्त मानवी बाह्यांगालाच खुणावतो असे नाही तर ती त्याच्या अंतरंगाचीही ओढ असते. आणि ही अशी मनाकाळजातील ओढ स्वस्थ बसूच देत नाही. सौन्दर्यासक्त मनाला तर या सर्वाचीच असीम ओढ लागलेली असते. आकाशातील चंद्राच्या बाबतीत असेच म्हणता येईल. अवकाशात चंद्रासारखा एखादाच ग्रह असेल जो पृथ्वीतलावरील मानवी मनाचा जिवाभावाचा सखा म्हणून मान्यताप्राप्त झालेला आहे. लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यानाच हवाहवासा वाटणारा हा स्निग्ध शीतलता प्रदान करणारा चंद्र बालपणापासून कथा, कहाण्यांमधून गोष्टी, कविता, जात्यावरील ओव्या अशा माध्यमातून अभिव्यक्त होत आलेला आहे. त्याला पाहण्याची, त्याच्याशी संवाद साधण्याची अनिवार ओढ वाढत्या वयालाही स्वस्थ बसू देत नाही. असे कोणते सामर्थ्य असावे या स्निग्ध वलयांकित गोलाईमध्ये की आजही त्याच्याविषयीची तेवढीच आत्मीयता तनामनाला वेढून राहिलेली आहे? चंद्राची विविध आकारप्रकारातील रूपे बघता बघता वय कधी वाढले ते कळलेच नाही. तरीदेखील आजही त्याला पाहताना तोच निखळ आनंद होतो. प्रत्येकच वेळी तो नित्यनूतन भासत आलेला आहे. ‘‘चांदोबा, चांदोबा भागलास का? निंबोणीच्या झाडामागे लपलास का? निंबोणीचे झाड करवंदी, मामाचा वाडा चिरेबंदी’’… ही अशी त्याची अंगाई तर त्यावेळी आणि अजूनही ओठांवर रुळलेली आहे. असे कोणते एक रुपलावण्य असावे त्याच्यापाशी की जीव अगदी वेडापिसा व्हावा.. प्रत्येक पौर्णिमेला त्याचे रूप खुलून येते,
प्रत्येकच वेळी ते वैविध्यपूर्ण असते. शरद पौर्णिमा हा तर या पौर्णिमांचा उत्कर्षबिंदू असतो. इथं एक लोकगीत आठवते जे
दवली मांड चवथीच्या दिवसात वाजवताना मालनी गायच्या….

दवले माणीचा वाजप,
आमचो गणोबा मखरात
तेचो उंदराचो वारू
तेचो मायेचो बोकलो
बोकल्याक बघून उंदरांन
मारली बेडूक उडी
गणूबा देऊ लवंडलो
चंद्रिम देऊ गे हासलो
चवथीच्या तये गे
चंद्रिमा नजरे घालू नये
त्याच्या जीवाला गे किरी
त्याने काय गे करूंचे?????

चतुर्थीच्या दिवसात आकाशीचा चंद्र लोकांनी पाहू नये, तो जर पहिला तर त्याला किरीवारी लागते असा लोकसमज समाजमनात दृढ आहे. त्यामागे कहाणी दडलेली असून उंदरावर बसून जाणारे गणोबा देव खाली पडतात त्यावेळी चंद्र त्यांना हसतो. गणोबाला राग येतो, ते चंद्राला शाप देतात. हीच कथा गीतात गुंफली गेली आहे. आता असे आहे म्हणून कोणी त्याचे तोंड पाहत नाहीत असे मुळीच नाही, उलट गणोबादेवाइतकेच चंद्रिम देवही लोकमनाला प्रिय आहे. चांदोबाला आपल्या न कळत्या वयापासून सर्वांचा मामा करून ठेवलेला आहे. ज्या मालनीना भाऊ नाही त्यांचा तो सर्वांचाच भाऊ आहे. चांदोबा या नावाने पूर्वी प्रकाशित होणारे मासिक तर सर्वांचे लाडके होते. पुनवेच्या पुर्णचंद्राला बारकाईने निरखून पाहिले असता त्याच्यात वेगवेगळ्या आकृत्या दिसायला लागायच्या. त्याविषयीचे अनेक तर्कवीतर्क लढविले जायचे. कोणाला तुळस, तर कोणाला ससा, हरीण असेही काही प्राणी दिसायचे. कवी, साहित्यिक, कलाकार यांना तर चंद्राच्या रूपाची मोहिनींच पडलेली आहे.

संपूर्ण दिवसभर तळपणारा तेजोनिधी सूर्याच्या प्रकाशामुळे या भूतलावर जीवजंतूंचा वावर अबाधित राहिलेला आहे. असे असूनही चंद्राची, त्याच्या शीतलतेची मोहिनी युगायुगापासून समाजमनावर आहे. त्यातही शरदपौर्णिमेचा चंद्र तर हवाहवासा वाटतो. आश्विन पौर्णिमा ही कोजागिरी पौर्णिमा असे मानले जाते. ही रात्र तर देवी लक्ष्मीची. उपोषण, पूजा व जागरण करून साजरी केली जाते. अश्विन महिन्याला सोनेरी महिना असेही संबोधले जाते. या महिन्यात सभोवताली सृष्टी जर न्याहाळली तर याची प्रचिती येते. हिरवाईची छटा ल्यालेला भाद्रपद अश्विनासाठी थोडा ओलावा ठेवूनच अस्तंगत होतो. तरारून परिपुष्ट झालेली भात शेतीवर ती पिकल्या कारणाने त्यावर सोनेरी रंग चढतो. सकाळच्या प्रहरी सूर्य उगवतो तोच मुळी पिवळे धमक ऊन घेऊनच. त्यामुळे परिसरालाच सोनसळी झळाळी येते. पाऊस तर भाद्रपदात परतीच्या प्रवासात असतो. यावेळी मात्र त्याचा मुक्काम बराच लांबला. त्याचा परिणाम सभोवतालावर झालाच आहे. गडद हिरवाईची परिसराला एवढी मोहिनी पडलेली आहे की मातीचा ओलावा प्राशून झाडांनीही थोडं तरुण, ताजेतवाने राहण्याचा आनंद उपभोगला. या अशा एकंदरीत भरलेपणाच्या आनंदात आकाशाची नितळता कोठेतरी हरवली. चांदण्याच्या सहवासात असलेला चांदोबा पुनवेच्या रात्रींनाही स्पष्टपणे दिसलाच नाही. कोजागिरी पुनवेला तर तो खूपच वेगळा भासतो, परंतु आज आत्ताही बरसत जाणार्‍या संततधारेतून पुनवेचे चांदणं ही बरसणार तर नाही ना… असा काहीसा विचार येत असतानाच कोजागिरीचे ते पिठोरी रूप मनातळात रुंजी घालते. बालपणी कोजागिरीचा उत्सव साजरा होतानाचा उत्साह मी अनुभवला होता तो पेडणे येथे. अवकाशात होणार्‍या बदलांचाही लोकमनावर पडणारा विलक्षण प्रभाव खूप जवळून पाहिला. अभूतपूर्व गर्दीत कोजागिरीचे चांदणे जमलेली सगळीच आकंठ प्राशून घेत असायची. आजही कोजागिरी तेवढ्याच उत्साहाने साजरी करण्यात येते. भाद्रपदातील चतुर्थीची मोहिनी मनावरून खाली उतरते न उतरते तोच अश्विनातील धनधान्याची सुबत्ता वातावरणात दिसून येते.

नवरात्रात नऊ प्रकारच्या धान्याची पेरणी मंदिरांच्या गर्भगृहात, घरच्या देवघरात करून ते रुजवण दूधपाण्याच्या शिंपणीने परिपुष्ट केले जाते. रुजून आलेली पिवळी लवलवीत पाती गृहिणींना केसात माळण्यासाठी देऊन निसर्गाच्या नवलाईचा सन्मानच केला जातो. सुजलाम, सुफलामतेचा हा महिना. घटस्थापना, देवीची नऊ रूपे, घटावर सोडलेल्या वैविध्यपूर्ण फुलांच्या माळा, दर दिवशी मंदिराच्या प्रांगणात सादर केली जाणारी कीर्तने भजने, आरत्या, नाटकांची परंपरा यातून या मासाला आलेला भरगच्च सांस्कृतिक गंध अधोरेखित होत राहतो. दसरोत्सवाची सांगता होते न होते तोच कोजागिरीचे चांदणे मनाला कवितेच्या निसर्ग-लावण्याच्या झुल्यावर झुलवते. नवरात्रात गोव्यातील बर्‍याच मंदिरात देवीच्या मूर्तीला झुल्यावर बसवून झोके दिले जातात. अशावेळी याची प्रत्यक्षात अनुभूती घेताना देवी सजीवंत झाल्यासारखी वाटते. तो सुखसोहळा अपूर्व असाच असतो. दसर्‍याच्या दिवशीचे शिवलग्न प्रकृती-पुरुषाचे मीलन पुढे येऊ घातलेल्या निसर्गाच्या नवसर्जनाची नांदीच असते. कोजागिरीला रात्र जागवायची.. त्यासाठी जागरण महत्वाचे. हे जागरण म्हणजे नुसतेच डोळे उघडे ठेवून जागे असणं नव्हे! तर शरीरचक्षुही तेवढेच जागृत असणे गरजेचे. आकाशाचा तो पुर्णचंद्र सोहळा, ते रंध्रारंध्रात पाझरणारे चांदणे बेधुंद जगता येणे आवश्यक आहे.

अलीकडे सर्वत्र कोजागिरीसाठी रात्र उघड्या डोळ्यांनी जागवतात. लक्ष्मी त्या रात्री पृथ्वीवर फेरफटका मारून बारकाईने निरीक्षण करते व म्हणते कोण जागे आहे? कोण जागे आहे? त्यासाठी जागृत राहणे आवश्यक असते. असा हा जागेपणा सर्वत्र विजेच्या दिव्यांचा चकचकाट करून तसेच ध्वनिक्षेपक कानठळ्या बसविणार्‍या आवाजात लावून नाचगाणी, धांगडधिंगा करीत केलेले जागरण असते. मोहक, पिठूर, दुधाळ चांदणसडा सर्वत्र पसरलेला आहे. जिथं पाहावं तिथं एक असे नितळ निरामय दृश्य दिसते. त्या तिथं उंच डोंगरावर चंद्रगोळा गालातल्या गालात हसत आहे. ती रात्र तर त्याचीच असते. एरव्ही इतर पुनवेला चंद्रसख्या चांदण्या त्याच्या आसपास सदैव असतात. परंतु कोजागिरीला मात्र त्याचा तोच असतो. एरव्ही चंद्र तर कृष्णासारखाच! कृष्ण कसा नेहमीच आपला गोपगोपिकांसह हसतखेळत राहणारा..! चंद्रसुद्धा तसाच अवतीभोवती पसरलेल्या नक्षत्रांच्या लुकलुकणार्‍या त्या सहवासात एकटाच.. तार्‍यांची गंमत पाहात गालातल्या गालात हसणारा. कोजागिरीची रात्र नुसतीच जागवायची याहीपेक्षा ती रात्र खर्‍या अर्थाने जगली गेली पाहिजे, तेव्हाच तर तिची अनुभूती मनाला येईल. एकांताचा सर्जनशील सहवास इथे महत्वाचा आहे. चंद्र तर सूर्यापेक्षा आपलासा वाटतो. त्या तेजोनिधीचे सजीवासाठीचे योगदान तर माहिती आहेच. असे असूनही उघड्या डोळ्यांनी चंद्राकडेच आम्ही पाहू शकतो. तासनतास त्याच्याकडे पाहात त्याचे ते रूपसौंदर्य मनात साठवून ठेवू शकतो.

गुडूप अंधारी… काळोखात तुडुंब भरलेली.. बर्‍याच वेळा हृदयात धडकीच भरविणारी रात्रही किती मोहक.. स्रवणारी.. जिवंत असू शकते! तिची भीती वाटत नाही, तर तिला मिठीत घ्यावेसे वाटणे… तिच्यावर जीव ओवाळून टाकीत तिला वाढत चढत जाताना हृदयात सामावून घेऊन जगणे उन्नत करणे आणि असेही शुद्ध जगता येते हा संदेश मनीमानसी डोळसपणे रुजविणे हेच तर जगणे असते. कोजागिरीला बसायचे अशा एका जागी जिथं सभोवताली असेल एखादं पसरत गेलेले अगदी दूर क्षितीजाच्या पल्याड विस्तीर्ण माळरान.. हिरव्यागार गवतावर मस्त, धुंदीत आकाशाकडे तोंड करून
असेच पसरावे .. तेव्हा दिसेल तो मायेने पाझरत जाणारा चांद्रगोल.. त्याच्या कडेकडेने वितळत जाणारे रुपेरी थेंब कोणत्याही क्षणी खाली भूतलावर.. त्या विस्तीर्ण पठारावर पडून त्यातूनच रुजून येणार असतात असंख्य चंद्र! ते हसणार.. हलणार.. डुलणार.. नाचणार..
गाणार…. कोजागिरीच्या नितळ स्पर्शात झाडांना न्याहाळत तासन्‌तास घालवायचे. एरव्ही अमावस्येच्या अंधारात झाडं काहीशी अनोळखीच भासतात, कोजागिरी मात्र त्यांना रुपेरी वर्ख बहाल करते. चंदेरी किनार तर त्यातील रस-रूप-गंधासकट भवताल जिवंत करते. आमच्या घराच्या गच्चीत बसल्यावर दूर तेथे वाघेरी डोंगर दिसतो. त्याच्या भाळी कोजागिरीचा चंद्र एवढा विलोभनीय भासतो की जणू काही पृथ्वीच्या कपाळावरील हा टिळाच आहे. कदंब वृक्षांच्या जाळीदार तुकड्या तुकड्यातून तर तो आणखीनच कमनीय कृष्ण सखाच शोभतो. आसमंतात सुखद गारवा पसरलेला, कदंबच्या मुळात सर्वत्र पसरलेली हिरवी मखमल, त्यावरचा चांदणसडा आणि आता अगदी काही क्षणातच गोपगोपिकांच्या रासक्रीडांना सुरुवातच होणार आहे. टाळ-मृदंग तनामनात वाजत राहतो… अशीच अनुभूती येते. कोजागिरीच्या चांदण्याचे ते रसपान आकंठ प्राशून तृप्ती अनुभवावी आणि तो चंद्र हृदयसिंहासनावर विराजमान व्हावा.. संपूर्ण रात्र जागविली तरीही मनाची कसली ती परिपूर्ती होतच नाही. तोच दिसावा, त्यालाच अनुभवावा. खरं तर चंद्र रोजच असतो आकाशात. सूर्याच्या प्रखरतेसमोर त्याचे तेज सौम्य, शांत, शीतल! सूर्याचा अस्त ही तर चंद्राची, कलेकलेने वाढत जाणार्‍या चंद्रकोरीची सुरुवात. दर एका पौर्णिमेला ती उजळत जाते. कोजागिरीचं उजळणं मात्र आगळे वेगळे. आश्विन हा तृप्तीचा महिना. ऊन पिवळे धम्मक, सोनेरी छटांचे.़ फुलाफ़ुलात पिवळा रंग विखुरलेला. छोटी छोटी इवलाली पिवळी फुलपाखरे सर्वत्र संचार करीत अश्विनला अधिकच खुलवून टाकतात. भात शेतीही पिवळी पिवळी. अशा या पिवळाईला
कोजागिरीचा रुपेरी वर्ख, वार्‍याच्या लहरीवर सोनसळी शेतात असा काही पसरतो की सर्वांगावर रोमांच उभे राहावेत. ऋतुचक्रातील प्रत्येक दिवसालाच इतिहास संस्कृती आहे. वर्षभर साजरे केले जाणारे सणउत्सव नैसर्गिक तत्वांची जाणीव करून देतात. कोजागिरी… दुधासारखी शुभ्र, सात्विक, संस्कारी. मंदिरात.. गावात तिला आठवले जाते, तिच्यासाठी जागरणं केली जातात. हे फक्त जागं राहणं नसावं, तर ती जागृती असावी मनाची. त्यात सामावलेली असावी ज्ञानप्राप्तीची तळमळ .. रसपान करता यावे तिच्या प्रत्येक रूपाचे. कलेकलेने वाढत चढत जाणारा तो अनुभवता यावा कदंब वृक्षाच्या पर्ण जाळीतून. त्याला मिरवावे डोक्यावर घेऊन, न्याहाळत बसावे त्याचे प्रतिबिंब तळ्यात. हुंगता आला तर वास ही हुंगावा. माझा मीपणाच सारा गळून पडावा.. मंगेश पाडगावकरांची कविता कोजागिरीच्या चंद्रासकट जगता आली तर बघावी. सर्वत्र फाकलेला, कडेकडेने स्त्रवणार्‍या रुपेरी सोनेरी कडा डोळ्यात उतराव्यात अन् मनात मात्र…..

नव्हतेच शब्द तेव्हा, मौनात अर्थ सारे
स्पर्शात चंद्र होता, स्पर्शात लाख तारे
ओथंबला फुलांनी अवकाश भोवताली
झाली फुले कळ्यांची, झाडे भरात आली

कोजागिरी मोकळ्या.. निरभ्र.. नितळ आकाशाची निळी निळी हाक.. चांदण्यांच्या झुबक्यानी मोहोरलेली रात्र, पाण्यातून वाहणार्‍या
चांद्रबिंबाचे कोवळेपण नक्षत्रांना बहाल केलेली चमचमणारी सांजवेळ, स्वरा-स्वरातून स्त्रवणारे आनंदगाणे आणि कोजागिरीचे
नित्यनवे तराणे.. अमृताचा चंद्रिमा आकाशात सर्वदूर पाझरत.. झिरपत आहे आणि अंतःकरणाने तर चांदण्यांचा संग धरलेला आहे.