भारोत्तोलनात जेरमीचे सोनेरी यश

0
102

ब्युनोस आयर्स
युथ ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने काल आपले पहिलेवहिले सुवर्णपदक पटकावले. भारोत्तोलक जेरमी लालरिनुंगा याने १५० किलो वजन उचलताना एकूण २७४ किलोंसह सुवर्ण यश संपादन केले. युथ ऑलिम्पिक स्पर्धेच्या इतिहासातील भारताचे हे पहिलेच सुवर्ण पदक ठरले. नानजिंग येथे २०१४ साली झालेल्या मागील वेळच्या युथ ऑलिम्पिकमध्ये भारताला केवळ दोन पदकांवर समाधान मानावे लागले होते.
पुरुषांच्या ६२ किलो वजनी गटातील ‘अ’ विभागात जेरमीने स्नॅच प्रकारात १२० किलो व १२४ किलो वजन यशस्वीरित्या उचलले. क्लिन अँड जर्कमध्ये सर्वाधिक १५० किलो वजन उचलून मिझोरमच्या या १५ वर्षीय भारोत्तोलकाने सुवर्ण आपल्या नावे केले. २६३ किलोंसह तुर्कीच्या टॉपटास कॅनर याने रौप्य तर २६० किलोंसह कोलंबियाच्या इस्तिवेन जुझे मांजारेस याने कांस्य पदक पटकावले. या वर्षाच्या सुरुवातीला जेरमी याने जागतिक युथ स्पर्धेत रौप्य पदक मिळविले होते व ज्युनियर आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत कांस्य पदक पटकावताना दोन राष्ट्रीय विक्रम मोडले होते. महिलांच्या ४८ किलो वजनी गटात स्नेहा सोरेन पाचव्या स्थानी राहिली. १०० मीटर बॅकस्ट्रोक प्रकारात श्रीहरी नटराजनला सहाव्या स्थानी समाधान मानावे लागले. टेबल टेनिसच्या एकेरीत अर्चना कामत व मानव ठक्कर यांनी आपापले सामने जिंकले. कामतने मलेशियाच्या जावेन चोंग हिला ४-२ असे तर ठक्क्करने स्लोवाकियाच्या आलेक्झांड्रा वोवक याला ४-१ असे पाणी पाजले. हॉकीत भारताने सोमवारी ऑस्ट्रियाचा ९-१ असा फडशा पाडला. तर मंगळवारी केनियाला ७-१ असे हरविले. भारताकडून सुदीप (चौथे व दहावे मिनिट), रविचंद्र (पाचवे व ११वे मिनिट), विवेक सागर (७वे मिनिट), संजय (१४वे मिनिट) व राहुल कुमार (१६वे मिनिट) यांनी गोल केले. केनियाचा एकमेव गोल ओर्लांडो याने सातव्या मिनिटाला केला.