भारत-चीन सीमेवरील संघर्षाने संसदेत गदारोळ

0
5

>> चकमकीवर चर्चा करण्यास सरकारचा नकार; विरोधकांचा सभात्याग

भारत-चीन सीमेवर अरुणाचल प्रदेशातील तवांग भागात भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये झालेल्या चकमकीवरून काल संसदेत प्रचंड गदारोळ झाला. या मुद्यावर स्थगन प्रस्तावाची नोटीस देत चर्चेची मागणी कॉंग्रेस, शिवसेना, तृणमूल कॉंग्रेससह अनेक विरोधी पक्षाच्या खासदारांनी केली. अखेर दुपारी १२ वाजता लोकसभेत देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी याबाबत अधिकृत निवेदन दिले. या प्रकरणात एकही जवान शहीद झाला नसल्याचे त्यांनी सभागृहाला सांगितले. चीनचा घुसखोरीचा प्रयत्न सैनिकांनी हाणून पाडल्याचेही त्यांनी सांगितले. पण संरक्षणमंत्र्यांच्या या वक्तव्यानंतर सभागृहात चर्चा घडवून आणण्यास मात्र नकार देण्यात आला. त्याचा निषेध म्हणून विरोधकांनी सभात्याग केला. सरकार या प्रकरणाची माहिती चार-चार दिवस लपवून का ठेवते, याबद्दलही विरोधकांनी सवाल उपस्थित केला.

भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये झालेल्या चकमकीबाबत राजनाथ सिंह यांनी लोकसभेत उत्तर दिले. ९ डिसेंबर २०२२ रोजी चीनच्या जवानांनी तवांगमध्ये एलएसीचे उल्लंघन करून नियम तोडले. भारतीय लष्कराने चीनच्या जवानांना अतिक्रमण करण्यापासून रोखले. त्यांना त्यांच्या पोस्टवर जाण्यास भाग पाडले. या घटनेत दोन्ही बाजूचे काही सैनिकही जखमी झाल्याचे संरक्षणमंत्र्यांनी सांगितले. आपला एकही सैनिक मरण पावला नाही किंवा गंभीर जखमी झाला नाही. सैन्याने वेळीच हस्तक्षेप केला. त्यामुळे चिनी सैनिक माघारी गेले, असे स्पष्टीकरण राजनाथ सिंह यांनी दिले.

काल लोकसभेत प्रश्नोत्तराचा तास चालू न दिल्याबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पत्रकारांशी बोलताना विरोधकांवर टीका केली. आज देशात भाजपचे सरकार आहे. जोपर्यंत आपले सरकार आहे, तोपर्यंत देशाची एक इंचही जमीन कुणीही बळकावू शकत नाही, असे शहा म्हणाले.