मणिपूरमध्ये ‘शूट ॲट साईट’चा आदेश

0
5

>> हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर राज्यपालांकडून मोठा आदेश जारी

मैतई समाजाला आदिवासी समाजात घेण्याच्या निर्णयावरून मणिपूरमध्ये मोठा हिंसाचार उफाळला असून, राज्यातील बिगर आदिवासी 8 जिल्ह्यांत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. खबरदारी म्हणून मोबाईल इंटरनेट सेवा पाच दिवस बंद ठेवण्यात आली आहे. आसाम रायफल्स आणि लष्कराच्या तुकड्या येथे तैनात करण्यात आल्या आहेत. असे असले तरी संभाव्य परिस्थिती लक्षात घेता मणिपूरचे राज्यपाल अनुसुया उके यांनी संबंधित यंत्रणांना ‘शूट ॲट साईट’चा आदेश दिला आहे.

राज्यात 53 टक्के असलेल्या मैतेई समुदायाला अनुसूचित जमातीचा दर्जा देण्याच्या मुद्यावर हा वाद भडकला आहे. मणिपूर उच्च न्यायालयाने 19 एप्रिलला एका आदेशाद्वारे मैतेई समुदायाचा अनुसूचित जातीत समावेश करण्याचे निर्देश दिले. त्याला राज्यातील नागा तसेच कुकी या समुदायांनी आक्षेप घेतला आहे. या निर्णयाला विरोध करण्यासाठी बुधवारी ऑल ट्रायबल स्टुडंट युनियन मणिपूर यांनी विष्णूनगर तसेच चुराचांदपूर जिल्ह्यात मोर्चा आयोजित केला होता. त्यात मोठ्या संख्येने युवक सामील झाले होते. त्यावेळी विष्णूपूर जिल्ह्यातील नागरिकांच्या गटाशी मोर्चेकऱ्यांची चकमक उडाली. त्यातून एका समुदायाची घरे जाळण्यात आली. राजधानी इम्फाळसह राज्यभर या हिंसेचे लोण पसरले. अखेर लष्कराला पाचारण करण्यात आले. मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांनी या मुद्द्यावर चर्चेतून मार्ग काढण्याचे आवाहन केले आहे.

मैतेई समुदायाची मागणी काय?
इम्फाळ खोऱ्यात मैतेई समुदायाचे प्राबल्य आहे. म्यानमार तसेच बांगलादेशमधून घुसखोरी मोठ्या प्रमाणात होत असल्याने अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते, असे मैतेई समुदायाचे म्हणणे आहे. त्या तुलनेत टेकड्यांच्या परिसरात राहणाऱ्या नागा तसेच कुकी यांना विविध कायद्यांनी संरक्षण आहे. त्यांच्या जमिनीवर अतिक्रमण करणे अशक्य आहे. राज्यातील 90 टक्के भाग टेकड्यांचा आहे, तर बाहेरील नागरिकांनी आमच्या वडिलोपार्जित जमिनींवर कब्जा केल्याचा दावा त्यापासून संरक्षणसाठी अनुसूचित जमातीत समावेशाची मागणी मैतेईंची आहे.

कधी दिला जातो ‘शूट ॲट साईट’चा आदेश?
हिंसाचार वाढत जात असल्याने मणिपूरच्या राज्यपालांनी ‘शूट ॲट साईट’चा आदेश दिला आहे. ज्यावेळी परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाते, आंदोलक ऐकण्याच्या मनस्थितीत नसतात, त्यावेळी शूट ॲट साईटचा आदेश दिला जातो. म्हणजेच, दंगलखोर दिसले की त्यांच्यावर जागीच गोळीबार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.