Home Featured भारत-अमेरिका व्यापार कराराची घोषणा

भारत-अमेरिका व्यापार कराराची घोषणा

0

भारतावरील आयातशुल्क 18 टक्क्यांपर्यंत कमी केल्याचा पियुष गोयल यांचा दावा;

भारत अमेरिकेशी 500 अब्ज डॉलर्सचा व्यापार करणार

भारत आणि अमेरिकेतील बहुप्रतिक्षित व्यापार करारावर काल अखेर शिक्कामोर्तब झाले. केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पियुष गोयल यांनी मंगळवारी या कराराची औपचारिक घोषणा केली. त्यांनी या कराराला भारताच्या उज्ज्वल भविष्याला चालना देणारा ऐतिहासिक टप्पा म्हटले आहे. या कराराअंतर्गत अमेरिकेने भारतीय वस्तूंवरील आयातशुल्क 50 टक्क्यांवरून थेट 18 टक्क्यांपर्यंत कमी केल्याचा दावा गोयल यांनी केला. त्यामुळे चीन, इंडोनेशिया, व्हिएतनाम आणि बांगलादेशसारख्या प्रादेशिक निर्यात प्रतिस्पर्ध्यांच्या तुलनेत भारताला मोठी आघाडी मिळणार आहे, असेही ते म्हणाले. तत्पूर्वी, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी रात्री उशिरा बहुप्रतिक्षित भारत-अमेरिका व्यापार कराराची घोषणा केली होती. ‘बाय अमेरिकन’ धोरणांतर्गत अमेरिकेकडून 500 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त किमतीचा माल भारत खरेदी करेल, असेही ट्रम्प यांनी नमूद केले होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात फोनवर झालेल्या चर्चेनंतर हा करार निश्चित झाला. काल भारत सरकारने अमेरिकेसोबतच्या व्यापार करारावर पहिले विधान जारी केले. मंगळवारी केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी माध्यमांना सांगितले की, या करारात कोणाच्याही हिताशी तडजोड केलेली नाही. हा असा करार आहे ज्याचा प्रत्येक भारतीयाला अभिमान असेल. पंतप्रधान मोदींनी नेहमीच कृषी आणि दुग्धजन्य क्षेत्रांना पाठिंबा दिला आहे, त्यांच्या हितांचे रक्षण केले आहे. दोन्ही देश लवकरच या करारावर संयुक्त निवेदन जारी करतील, असेही गोयल म्हणाले.
या करारामुळे भारताच्या निर्यातीला चालना मिळेल. सर्व उत्पादन क्षेत्रांना असंख्य संधी उपलब्ध होतील, ज्यामध्ये आपल्या अभियांत्रिकी क्षेत्रातील उत्पादन भाग, कापड, सागरी वस्तू आणि दागिने क्षेत्रातील उत्पादन क्षेत्र यांचा समावेश आहे, असेही गोयल म्हणाले.

भारत अमेरिकेकडून काय खरेदी करणार?
आता भारत अमेरिकेकडून काय काय खरेदी करणार हा अनेकांच्या औत्सुक्याचा विषय आहे. भारत अमेरिकेकडून, पेट्रोलियम, संरक्षण, इलेक्ट्रॉनिक्स, फार्मास्युटिकल्स, टेलिकॉम उत्पादने आणि विमाने खरेदी करेल. या कराराचा उद्देश दोन्ही देशांमधील व्यापार तूट कमी करणे असा आहे. आगामी काळात याचा अनेक क्षेत्रांवर प्रभाव पडेल, असे बोलले जात आहे. या कराराचा एक भाग म्हणून भारताने काही कृषी उत्पादनांसाठी आपली बाजारपेठ खुली करण्यासंदर्भातही भाष्य केले आहे. मात्र याबाबतचा सविस्तर तपशील अद्याप उघड झालेला नाही.

भारत करणार 500 अब्ज डॉलरपर्यंत खरेदी
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या कराराला दुजोरा देताना म्हटले आहे की, भारत उच्च स्तरावर अमेरिकन उत्पादने खरेदी करण्यास तयार झाला आहे. तो 500 अब्ज डॉलर्सपर्यंत ऊर्जा, कोळसा, तंत्रज्ञान, कृषी आणि इतर उत्पादने खरेदी करू शकतो. दोन्ही देशांतील व्यापारात संतुलन साधण्यासाठी अमेरिकेच्या विनंतीवरून भारताने ऑटोमोबाईलवरील आयातशुल्क कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अमेरिकन वाहने भारतीय बाजारपेठेत स्वस्त दरात उपलब्ध होऊ शकतात.

लोकसभेतील 8 खासदारांचे निलंबन
राहुल गांधी यांनी लोकसभेत माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांच्या अप्रकाशित पुस्तकातील उल्लेखावरून सत्ताधाऱ्यांना घाम फोडलेला असताना काल अमेरिकेबरोबर भारताने व्यापार करार केल्यावरून राहुल गांधींनी आवाज उठवला. या प्रश्नी राहुल गांधींचे समर्थन करणाऱ्या खासदारांनाच निलंबित केले. लोकसभेतील विरोधी पक्षांच्या आठ खासदारांना निलंबित करण्यात आले. या खासदारांनी लोकसभेत कागदपत्रे भिरकावली असल्याचा आरोप करण्यात आला आहे. निलंबित केलेल्या 8 सदस्यांमध्ये गुरजीत औजला, हिबी एडन, माणिकम टागोर, प्रशांत यादराव पडोळे, किरण कुमार रेड्डी, डीन कुरियाकोसे, अमरिंदर सिंग राजा वारिंग आणि एस. वेंकटेशन यांचा समावेश आहे. लोकसभेतील 8 खासदारांच्या निलंबनाविरोधात आणि भारत-अमेरिका व्यापार कराराच्या विरोधात राहुल गांधी, प्रियंका गांधी वड्रा आणि इतर खासदारांनी संसदेच्या मकर द्वार येथे निदर्शने केली.

भारतीय बाजार पूर्णपणे
अमेरिकेसाठी खुला?

ट्रम्प यांच्या विधानानुसार भारत अमेरिका परस्परविरोधी करासह इतर अडथळे शून्यावर आणणार आहे. याचा थेट परिणाम भारतीय उद्योग, व्यापारी आणि शेतकऱ्यांवर होऊ शकतो, असा इशारा काँग्रेसने दिला आहे.

कृषी क्षेत्र अमेरिकेसाठी
पूर्णपणे खुले : काँग्रेस

भारत-अमेरिका व्यापार करारानुसार भारतीय कृषी क्षेत्र अमेरिकेसाठी खुले करण्यात आल्याचा आरोप काँग्रेसने केला असून, या कराराच्या तपशीलावर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. या व्यापार करारामुळे देशातील शेतकऱ्यांचे हित धोक्यात आल्याचे सांगत, सरकारने संसदेत श्वेतपत्रिका काढावी अशी मागणी काँग्रेसने केली आहे.

अमेरिकन वस्तूंवर शून्य आयातशुल्क;
अन्‌‍ रशियाकडून तेल खरेदी बंद : ट्रम्प

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत अमेरिकन वस्तूंवर शून्य आयातशुल्क लावेल, असा दावा केला असून, तज्ज्ञ याचे विविध अर्थ काढत आहेत. या करारानंतर भारत रशियाकडून तेल खरेदी करणे बंद करेल, असा दावाही ट्रम्प यांनी केला आहे.

…म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून पहिल्यांदा घोषणा
या कराराची घोषणा सर्वात आधी डोनाल्ड ट्रम्प यांनीच केल्याने काँग्रेसने केंद्र सरकारवर टीका केली आहे. त्यावर काल पियुष गोयल यांनी स्पष्टीकरण दिले. अमेरिकेने परस्पर शुल्क (रेसिप्रोकल टॅरिफ) लागू केले होते आणि ते कमी करावे लागल्यामुळे अमेरिकेनेच प्रथम ट्विट केले, असे गोयल म्हणाले. भारतीय निर्यातीवरील शुल्क सुमारे 50 टक्क्यांवरून सुमारे 18 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आले असल्याचा त्यांनी उल्लेख केला. अमेरिकेने परस्पर शुल्क लागू केले होते आणि ते मागे घ्यावे लागल्यामुळे ही माहिती अमेरिकेकडूनच येणे स्वाभाविक होते, असेही ते म्हणाले.

पंतप्रधानांवर प्रचंड दबाव : राहुल गांधी
अमेरिकेबरोबर भारताने व्यापार करार केल्यानंतर लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. राहुल गांधींनी संसदेच्या बाहेर माध्यमांशी बोलत असताना पंतप्रधान मोदींवर टीका केली. पंतप्रधान मोदी घाबरलेले आहेत. जो व्यापार करार चार महिन्यांपासून रखडला होता, त्यात काहीच बदल न करता स्वाक्षरी केली गेली आहे. जे पंतप्रधानांनी काल सायंकाळी करारावर स्वाक्षरी केली. त्यांच्यावर खूप दबाव आहे, असेही ते म्हणाले.

पंतप्रधान मोदींनी देश विकला : राहुल गांधी
भारतातील शेतकऱ्यांच्या घामाला पंतप्रधान मोदींनी विकले आहे. त्यांनी फक्त शेतकरी आणि सामान्य लोकांना नाही तर देशालाही विकले आहे, असे राहुल गांधी म्हणाले. पंतप्रधान मोदींवर कोणता दबाव आहे? असा प्रश्न माध्यमांनी विचारला असता त्यावरही राहुल गांधी यांनी भाष्य केले. गौतम अदाणी यांच्यावर अमेरिकेत खटला दाखल आहे. हा खटला अदाणींना लक्ष्य करत नाही, तर तो पंतप्रधान मोदींच्या आर्थिक ढाच्याला लक्ष्य करत आहे. दुसरा विषय एपस्टीन फाईल्सचा आहे, असे राहुल गांधी म्हणाले.