भारत-अमेरिका यांच्यात महत्त्वपूर्ण संरक्षण करार

0
90

भारत व अमेरिका यांच्यात काल संरक्षण विषयक एक मोठा व महत्त्वपूर्ण करार करण्यात आला. भारताचे संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर व अमेरिकी संरक्षण मंत्री ऍश्टन कार्टर यांनी या करारावर स्वाक्षर्‍या केल्या. या करारानुसार उभय देशांच्या सैन्य दलांना उभय देशांमधील सामग्री तसेच विमानतळ यांचा वापर करण्याची मोकळीक मिळणार आहे.

तथापि या कराराचा अर्थ भारतीय भूमीवर अमेरिकेचे सैन्य तैनात करणे असा नसल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. भारताच्या एखाद्या मित्र देशाविरुध्द अमेरिकेने युध्द छेडल्यास अशा वेळी अमेरिकी सैन्याला भारतीय भूमीचा वापर करू दिला जाणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले. मात्र संरक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते हा करार आशिया प्रशांत महासागर क्षेत्रात अमेरिकी सैन्य दलास लाभदायक असल्याचे मानले जात आहे. या कराराच्या परिणामस्वरुप उभय देशांमध्ये जाणारी लढाऊ विमाने व युध्दनौकांना उभय देशांमध्ये इंधन भरणे आता शक्य होईल.
करारावर स्वाक्षर्‍या केल्यानंतर मनोहर पर्रीकर व ऍश्टन कार्टर यांनी कराराचे स्वागत केले. हा करार म्हणजे संरक्षण क्षेत्रातील व्यावसायिक संपर्क तसेच देवाण-घेवाण या संदर्भात संधी उपलब्ध करून देणारा आहे. या करारामुळे उभय देशांच्या सैन्य दलांमध्ये सामग्री नेण्यासाठी सहकार्य, पुरवठा व सेवा यांची देवाण-घेवाण शक्य होईल असे मत उभय संरक्षणमंत्र्यांनी मांडले.
या करारात संरक्षण तंत्रज्ञान व व्यापार याविषयीच्या सहकार्यावर भर देण्यात आला असल्याचे एका निवेदनात नमूद करण्यात आले आहे.