भारतात कोरोनाचे ९९ कोटी लसीकरण

0
32

>> केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती

भारतात १६ जानेवारीपासून सुरू करण्यात आलेल्या लसीकरण मोहिमेने काल तब्बल ९९ कोटींचा टप्पा गाठला आहे. देशात तिसर्‍या लाटेची शक्यता वर्तवली जात असताना लसीकरणातील ही विक्रमी कामगिरी दिलासादायक आहे. देशात ९९ कोटी लोकांना लशीचे डोस देण्यात आल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी ट्विट करून दिली आहे.
आपण ९९ कोटींवर आहोत आणि १०० कोटी लसीकरणाचा मैलाचा दगड गाठण्यासाठी भारताची विक्रमी वाटचाल सुरू असल्याचे ट्विट त्यांनी केले आहे.

दरम्यान, गेल्या २४ तासांत देशभरात ८७,४१,१६० जणांचे लसीकरण करण्यात आले. तसेच देशात गेल्या २४ तासांत केवळ १३ हजार ५८ नवे रुग्ण आढळले आहेत. ही रुग्णसंख्या केल्या २३१ दिवसांतील सर्वात कमी रुग्णसंख्या आहे. तसेच १९ हजार ४७० रुग्णांनी दिवसभरात कोरोनावर मात केली असून १६४ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. एकूण बाधितांची संख्या ३ कोटी ४० लाख ९४ हजार ३७३ झाली असून आतापर्यंत ३ कोटी ३४ लाख ५८ हजार ८०१ रुग्ण करोनातून बरे झाले आहेत. तसेच आतापर्यंत ४ लाख ५२ हजार ४५४ लोकांना कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.