>> हाँगकाँग, सिंगापूर आणि थायलंडमध्ये रुग्णसंख्येत वाढ
हाँगकाँग, सिंगापूर आणि थायलंड या आशियातील देशांमध्ये गेल्या आठवड्यात कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. भारतातदेखील कोरोनाचे नवे रुग्ण आढळून आले आहेत. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या कोविड डॅशबोर्डनुसार देशात गेल्या आठवड्यात 58 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 93 इतकी झाली आहे. काही रुग्णांमध्ये व्हायरल ताप आणि कोरोनासारखी लक्षणे आढळून येत असताना त्यांच्या कोरोना तपासणी चाचण्या करण्याचा सल्ला दिला जात नसल्याचे चित्र आहे. मात्र, डॉक्टर्स आणि आरोग्य तज्ज्ञांनी नागरिकांना घाबरण्याऐवजी सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
सिंगापूरमध्ये मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात रुग्णसंख्या 14200 वर पोहोचली आहे. हाँगकाँगमध्ये कोरोना चाचण्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. चाचण्यांचे प्रमाण 13.66 टक्क्यांवर आहे.
तामिळनाडू, केरळ,
पुदुचेरीमध्ये रुग्ण
भारतात कोरोनाची स्थिती स्थिर आहे. सक्रिय कोरोना रुग्णांची संख्यादेखील कमी आहे. केरळ, तामिळनाडू या सारख्या राज्यात अधिक तपासणी होत असल्याने तिथे कोरोना रुग्णांची संख्या अधिक आहे. कोरोना डॅशबोर्डच्या आकडेवारीनुसार भारतात गेल्या आठवड्यात 58 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी 85 टक्के रुग्ण म्हणजेच 46 रुग्ण तामिळनाडू, केरळ आणि पुदुचेरीमधील आहेत.