भारतात ‘एक्सई’चा प्रादुर्भाव नाही

0
22

>> केंद्रीय आरोग्य मंत्र्यालयाचा दावा

>> लसीकरणामुळे धोका नाही ः डब्ल्यूएचओ

ओमिक्रॉनचा ‘एक्सई’ हा नव्या प्रकारचा भारतातील पहिला रुग्ण मुंबईत आढळला आहे. मात्र केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने या विषाणूच्या महाराष्ट्रातील प्रादुर्भावाचे वृत्त ङ्गेटाळले आहे. तसेच कोरोनाच्या या नव्या प्रकाराबाबत जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य शास्त्रज्ञ डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी दिलासा देताना लसीकरणामुळे भारतात या विषाणूचा जास्त फैलाव होणार नसल्याचा दिलासा दिला आहे.

ओमिक्रॉनच्या इA. १ आणि इA.२ हे दोन व्हेरिएंट एकत्र येऊन एक्सई या नमुन्याची निर्मिती झाल्याचे मानण्यात येत आहे. या नव्या नमुन्याचा संसर्ग झालेला पहिला रुग्ण १९ जानेवारी रोजी ब्रिटनमध्ये आढळला होता. हा नवा प्रकार ओमिक्रॉनच्या १० पट वेगाने पसरू करू शकतो, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे भारतात या प्रकाराचा शिरकाव झाल्यास कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढण्याचा धोका आहे.

दरम्यान, कोरोनाचा हा नवा प्रकार इतर प्रकारांपेक्षा १०% जास्त संसर्गजन्य आहे. म्हणजेच त्याचा प्रसार होण्याचे प्रमाण जास्त आहे. याबाबत डब्ल्यूएचओच्या मुख्य शास्त्रज्ञ डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी, आमचा एक्सई या प्रकाराचा अभ्यास सुरू असून त्याबाबत माहिती गोळा केली जात आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार या प्रकाराला घाबरण्याची गरज नाही. कारण यामुळे रुग्ण जास्त गंभीर होत नाही. ज्यांचे लसीकरण करण्यात आले आहे त्यांना सुरुवातीची कोणतीही गंभीर लक्षणे दिसत नाहीत, अशी दिलासादायक माहिती दिली आहे.

सौम्य संसर्ग
कोरोनाच्या नव्या एक्सई या विषाणूची संसर्गक्षमता अधिक असली तरीही त्यामुळे होणारा संसर्ग अतिशय सौम्य स्वरूपाचा आहे. तिसर्‍या लाटेमध्ये अनेकांना बीए१ आणि बीए२ याची लक्षणे असण्याची शक्यता नाकारता येत नाही. अनेकांनी लक्षणे सौम्य असल्याने चाचणी करून घेतली नाही. सर्वसामान्यांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रतिकारशक्ती निर्माण झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. लसीकरणाचा वेगही इतर देशांच्या तुलनेत अधिक असल्याने तसेच ज्येष्ठ नागरिकांना बूस्टर मात्रा देण्यास सुरुवात झाल्याने हा आजार झाला तरी तो सौम्य स्वरूपाचा असेल. असा दिलासा तज्ज्ञांनी दिला आहे.

जागतिक आरोग्य संघटनेचा दिलासा

कोरोनाच्या एक्सई या प्रकाराचा भारतात डेल्टासारखा परिणाम होण्याची शक्यता नाही. भारतातील बहुतेक लोकांचे करोना लसीकरण करण्यात आले आहे, त्यामुळे भारताला या प्रकाराचा जास्त धोका नसल्याचा दिलासा जागतिक आरोग्य संघटेनेने दिला आहे.

ज्येष्ठ नागरिकांनी जून-जुलैपर्यंत
मास्क वापरावा ः डॉ. साळकर

राज्य सरकारने मास्क बंधनकारक नसल्याचा निर्णय जाहीर केला तरी आजारी, ज्येष्ठ नागरिक, डॉक्टरांनी येत्या जून-जुलैपर्यंत मास्क वापरायला हवा, असे मत डॉ. शेखर साळकर यांनी पत्रकारांशी बोलताना काल केले.
देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाल्याने काही राज्यांनी मास्क बंधनकारक नसल्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राज्यात मास्क मुक्तीचा निर्णय घेतला जाणार असल्याचे बुधवारी म्हटले होते.
या पार्श्‍वभूमीवर बोलताना डॉ. साळकर यांनी, विविध आजारांनी त्रस्त नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी मास्कचा वापर करावा. कोविडच्या चौथ्या लाटेची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी मास्क वापरावा असे डॉ. साळकर यांनी सांगितले.