भारताची ५ जूनला आफ्रिकेविरुद्ध सलामी

0
130

>> ‘क्रिकेट विश्‍वचषक २०१९’ स्पर्धा होणार राऊंड रॉबिन पद्धतीने

इंग्लंड व वेल्स येथे पुढील वर्षी ३० मे ते १४ जुलै या कालावधीत होणार्‍या आगामी ‘क्रिकेट विश्‍वचषक २०१९’ स्पर्धेत भारतीय संघ आपला सलामीचा सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळणार आहे. २ जूनऐवजी ५ जून रोजी हा सामना होईल, आयसीसीच्या कोलकाता येथील मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांच्या बैठकीत सदर बदलाला मान्यता देण्यात आली. आयसीसीने शिक्कामोर्तब केल्यानंतरच स्पर्धेचे वेळापत्रक, सामन्यांची स्थळे, वेळा जाहीर करण्यात येणार आहेत.

लोढा समितीच्या शिफारसीनुसार इंडियन प्रीमियर लीगचा अंतिम सामना व आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील भारताचा सामना यात किमान १५ दिवसांचा कालावधी अनिवार्य असल्याने हा बदल करण्यात आला आहे. पुढील वर्षी २९ मार्च ते १९ मे या कालावधीत इंडियन प्रीमियर लीग होणार आहे. लोढा समितीच्या शिफारसी अंमलबजावणी करत असल्याने २ जून रोजी सामना खेळणे भारताला शक्य झाले नसते, असे बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले. आयसीसीच्या जागतिक स्तरावरील अधिकांश स्पर्धांची सुरुवात भारत-पाक सामन्याने झाली आहे. यात २०१५ क्रिकेट विश्‍वचषक, ऑस्ट्रेलिया (ऍडिलेड) व २०१७ साली युके मधील चॅम्पियन्स करंडक (बर्मिंघम) स्पर्धेचा समावेश आहे. यावेळी मात्र असे होणार नाही. आगामी विश्‍वचषक स्पर्धा राऊंड रॉबिन पद्धतीने (१९९२ साली झालेल्या विश्‍वचषकात वापरण्यात आलेली पद्धत) होणार असून प्रत्येक संघ एकमेकांविरुद्ध खेळणार आहे. त्यामुळे साखळीत एकूण ४५ सामने खेळविले जाणार आहेत. साखळी फेरीनंतर अव्वल राहणारे चार संघ उपांत्य फेरीत प्रवेश करतील. या सामन्यांतील विजेते संघ लॉडर्‌‌स मैदानावर अंतिम सामन्यात उतरणार आहेत. स्पर्धेतील उपांत्य सामने ओल्ड ट्रॅफर्ड व एजबेस्टन येथे खेळविण्याचे संकेत इंग्लंडच्या क्रिकेट मंडळाने दिले आहेत.

विश्‍वचषकाव्यतिरिक्त २०१९-२०२३ वर्षांसाठीच्या ‘एफटीपी’ला यावेळी मान्यता देण्यात आली. यामध्ये भारतीय संघ कमाल ३०९ दिवस आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणार आहे. मागील टूर प्रोग्रामपेक्षा यामध्ये ९२ दिवस कमी आहेत. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेमुळे भारतातील कसोटी सामन्यांची संख्या १५ वरून १९ झाली आहे. या काळात भारत कोणताही दिवस-रात्र कसोटी सामना खेळणार नसल्याचे निश्‍चित झाले आहे.

भारताचे प्रस्तावित सामने ः ५ जून ः द. आफ्रिका, ९ जून ः ऑस्ट्रेलिया, १३ जून ः न्यूझीलंड, १६ जून ः पाकिस्तान, २२ जून ः अफगाणिस्तान, २७ जूनः वेस्ट इंडीज, ३० जून ः इंग्लंड, २ जुलै ः बांगलादेश, ६ जुलै ः श्रीलंका.