पणजीतील व्यापार्‍यांची करांच्या फेररचनेची मागणी मान्य

0
223

>> करविषयक तक्रारींवर लवकरच तोडगा

नगरविकास मंत्री फ्रान्सिस डिसोझा, पणजीचे महापौर विठ्ठल चोपडेकर व महापालिका आयुक्त अजित रॉय यांनी काल पणजीतील हॉटेल व व्यापारी संघटनेच्या महापालिकेच्या वाढत्या करांसंबंधी असलेल्या तक्रारी ऐकून घेतल्या व दोन-एक महिन्यात तोडगा काढण्याचे त्यांना आश्‍वासन दिले. काल मंत्रालयात नगरविकास मंत्री फ्रान्सिस डिसोझा यांच्या केबिनमध्ये झालेल्या बैठकीत पणजीतील हॉटेल्स व व्यापारी यांना विविध अर्ज ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात यावेत तसेच करांची फेररचना करण्यात यावी ही मागणी महापालिका आयुक्तांनी मान्य केल्याचे संघटनेचे अध्यक्ष बेर्नाबे सापेको यांनी सांगितले.

नगरविकास मंत्री फ्रान्सिस डिसोझा म्हणाले, की आपण मंत्री असलो तरी महापालिका प्रशासनाच्या कामात हस्तक्षेप किंवा लुडबूड करू शकत नाही. त्यामुळे आपण पालिका आयुक्तांना वरील मागणी संबंधी कोणताही आदेश दिलेला नाही. मात्र, त्यांना व्यापार्‍यांच्या ज्या मागण्या आहेत त्यात सहानुभूतीपूर्वक लक्ष घालण्याची सूचना केल्याचे ते म्हणाले. यावेळी व्यापार्‍यांनी पणजीत कित्येक हातगाडेवाले रस्त्या रस्त्यांवर अन्न पदार्थ विकत असतात. ते महापालिकेत कोणताही कर भरत नाहीत. या हातगाडेवाल्यांना हटवण्याची मागणी केली. मात्र, कायदेशीरपणे अशा प्रकारे हातगाडेवाल्यांना धंदा करून देण्यास विरोध नसल्याचे व्यापार्‍यांनी बैठकीत मंत्र्यांना सांगितले.

मंत्री डिसोझा यांनी यावेळी महापालिका आयुक्तांना बेकायदेशीररित्या अन्न पदार्थांची विक्री करणारे गाडे शहरातून हटवण्याची सूचना केली. जे व्यापारी कचरा करीत नाहीत अथवा अत्यल्प कचरा करतात त्यांना कचरा शुल्कातून सूट देण्यात यावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली. विविध परवान्यांसाठी एक खिडकी योजना अमलात आणण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. आयुक्त अजित रॉय यांनी यावेळी ऑनलाईन सुविधेसह एक खिडकी योजनेची दोन एक महिन्यात कार्यवाही करण्याचे आश्‍वासन व्यापार्‍यांना दिले.