भारताची सुवर्ण झळाळी

0
114

भारतीय क्रीडाक्षेत्रासाठी टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा आपल्या मेहनतीचे प्रदर्शन जगाला दाखवून वाहवा मिळविण्याचे व्यासपीठ ठरले. स्पर्धेच्या सुरुवातीलाच मीराबाई चानूने रौप्य पदकाची कमाई करीत सुरेख प्रारंभ करून दिल्यानंतर सरतेशेवटी भालाफेकपटू नीरज चोप्राने एखाद्या बॉलिवूड चित्रपटाप्रमाणे शेवट सुवर्णपदकाने गोड केला. स्पर्धेच्या या वाटचालीदरम्यान अनेक अचंबित करणारे निकाल भारतीयांनी नोंदविले. अनेकांकडून अपेक्षाभंग देखील झाला, परंतु, एखाद्या मोठ्या मंचावर १४० कोटी भारतीयांचा दबाव झेलून सर्वोत्तम कामगिरी पार पाडणे सहजा शक्य होत नसते. खेळात जय पराजय हे ठरलेलेच असतात, त्यामुळे अपयशांचे दुःख कवटाळून बसण्यापेक्षा यशाचा आनंद साजरा करणे कधीही चांगलेच.
ऑलिम्पिकमध्ये नेमबाजी, कुस्ती, भारोत्तोलन अशा काही प्रकारांपुरते भारताचे यश मर्यादित होते. यंदाची ऑलिम्पिक स्पर्धा मात्र याला अपवाद ठरली. घोडेस्वारीमध्ये फवाद मिर्झाने अंतिम फेरीपर्यंत मारलेली धडक, गोल्फमध्ये अदिती अशोकने मिळवलेले चौथे स्थान, नौकानयनामध्ये अरविंद सिंग व अर्जुन लाल यांनी ‘टॉप १२’ मध्ये मिळवलेले स्थान, पुरुष रिले संघाने आशियाई विक्रम नोंदविताना केलेली सुरेख कामगिरी, पुरुष हॉकी संघाचे ऐतिहासिक कांस्यपदक व महिला हॉकी संघाने मिळवलेले सर्वोत्तम चौथे स्थान. अपवादांची मालिका येथेच न थांबता ती भालाफेकीपर्यंत सुरूच राहिली.
नीरज चोप्राने या सर्वांच्या कामगिरीवर कळस चढवताना सुवर्ण पदकाची कमाई केली. तांत्रिकदृष्ट्या आपल्यापेक्षा सरस असलेल्या अनेक खेळाडूंवर कुरघोडी करीत त्याने आपल्या नियोजनबद्ध खेळाची झलक अंतिम फेरीत दाखवून दिली. पात्रता फेरीत अव्वल राहून आगामी पदकाची झलक दाखवल्यानंतर त्याने महत्त्वाच्या क्षणी आपण कच खाणार नाही याची पुरेपूर दक्षता घेतली. जागतिक क्रमवारीत कोणी कुठल्याही स्थानी असलेला खेळाडू समोर असला तरी आपले सर्वोत्तम प्रदर्शन करण्याचा निर्धारानेच तो अंतिम फेरीत उतरला होता. जर्मनीचा दिग्गज खेळाडू योहानस वेट्टर याने स्पर्धेपूर्वी वाक्‌युद्ध छेडण्याचा प्रयत्न करीत सुवर्ण आपणच जिंकणार असल्याची डरकाळी फोडली होती. नीरजला सुवर्णपदकाची काडीमात्र संधी नसल्याचे तो म्हणाला होता. नीरजने मात्र स्वतःच्या स्वभावास अनुरुप त्याला कोणतेही प्रत्युत्तर दिले नव्हते. वेट्टर याने पात्रता फेरीत दुसर्‍या स्थानावर राहून अंतिम फेरी गाठली होती. यंदाच्या मोसमातील सर्वांत यशस्वी खेळाडू म्हणून अंतिम फेरीत त्याच्याकडून प्रचंड अपेक्षा होत्या. परंतु, पहिल्या तीन फेकींनंतरच त्याला मैदान सोडावे लागले. त्यामुळे अंतिम आठ खेळाडूंचा समावेश असलेल्या शेवटच्या फेरीत त्याचा समावेश नव्हता.
चेक प्रजासत्ताकच्या जाकुब वाल्देच याने आपल्या पाचव्या प्रयत्नात ८६.६७ मीटर अंतर कापले, त्यावेळी भारतीयांच्या काळजाचा ठोका चुकला होता. त्याचा अजून एक प्रयत्न बाकी होता. त्यामुळे नीरजला तो शेवटच्या प्रयत्नात मागे टाकण्याची शक्यता होती. परंतु, सुदैवाने असे काही घडले नाही व नीरज सुवर्णपदकाचा मानकरी ठरला. नीरजने भालाफेकीचा अंतिम सामना बुद्धिबळाच्या खेळासारखा चाणाक्षपणे खेळला. ताजेतवाने असताना त्याने आपले सर्वस्व पणाला लावत भाला फेकताना ८७.५८ व ८७.०३ असे अंतर कापले. यानंतर त्याने इतर खेळाडूंवर नजर ठेवण्याचे काम केले. उर्वरित चार प्रयत्नांमध्ये त्याचा ९०.५७ चा ऑलिम्पिक विक्रम मोडण्याचा इरादा होता, परंतु आपल्याला ते शक्य झाले नाही अशी कबुली त्याने नंतरच्या पत्रकार परिषदेत दिली. गरज पडल्यास सहाव्या व शेवटच्या फेकीसाठी त्याने आपल्याला तयार ठेवले होते. परंतु, इतर कोणीही जवळपास फिरकू न शकल्याने नीरजला त्याची गरज पडली नाही. भारताने ऑलिम्पिकमध्ये विक्रमी कामगिरी करीत सात पदके यावेळी मिळवली. केंद्र सरकारची ‘टार्गेट ऑलिम्पिक पोडियम’ ही प्रोत्साहनपर योजना, ‘खेलो इंडिया’सारख्या स्पर्धांमुळे गावोगावी रुजत असलेल्या क्रीडा संस्कृतीचादेखील भारताच्या ऑलिम्पिक यशात खारीचा वाटा आहे. नीरज चोप्राच्या पावलावर पाऊल टाकत अनेकजण भालाफेकीसारख्या दुर्लक्षित क्रीडाप्रकाराकडे वळतील यात दुमत नाही. देशात खेळाडूंच्या रुपात अनेक हिरे दडलेले आहेत. नीरज चोप्राच्या रुपाने भारताला असाच एक हिरा गवसला आहे. सैन्यदलात सुभेदारपदावर असेलल्या या हिर्‍याला व स्पर्धेत चमकलेल्या इतर हिर्‍यांना मानाचा मुजरा!