भारताचा विंडीजवर मालिका विजय

0
135

>> शार्दुल ठाकूरची फटकेबाजी ठरली निर्णायक

कर्णधार विराट कोहली, सलामीवीर रोहित शर्मा आणि लोकेश राहुल यांनी झळकावलेल्या अर्धशतकांनंतर जडेजा व ठाकूर यांच्या मौल्यवान भागीदारीच्या बळावर भारताने तिसर्‍या व शेवटच्या वन-डे सामन्यात वेस्ट इंडीजवर ४ गडी व ८ चेंडू राखून मात केली आहे. विंडीजने दिलेले ३१६ धावांचे आव्हान भारताने ४८.४ षटकांत गाठले. या विजयासह भारताने ३ वन-डे सामन्यांची मालिका २-१ अशी खिशात घातली.
विंडीजने विजयासाठी दिलेल्या दिलेल्या ३१६ धावांचा पाठलाग करताना भारताची सुरुवात आक्रमक झाली. रोहित शर्माने आपले ४३वे आणि लोकेश राहुल याने आपले पाचवे अर्धशतक झळकावत पहिल्या गड्यासाठी १२२ धावांची भागीदारी केली. दोन्ही फलंदाजांनी विंडीजच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. जेसन होल्डरने रोहित शर्माला माघारी धाडत भारताची जमलेली जोडी फोडली. यानंतर लोकेश राहुलही माघारी परतला. राहुलने ७७ तर रोहितने ६३ धावा केल्या. श्रेयस अय्यर, केदार जाधव आणि ऋषभ पंत स्वस्तात माघारी परतल्यामुळे भारतीय गोटात चिंतेचे वातावरण पसरले. १ बाद १६७ अशा भक्कम स्थितीतून भारतीय संघाची ५ बाद २२८ अशी घसरण झाली. विराटने एक बाजू लावून धरत रवींद्र जाडेजाच्या साथीने भारताचा डाव सावरला. विजयासाठी अवघ्या २७ धावा हव्या असताना पॉल याने विराटचा वैयकिक ८५ धावांवर त्रिफळा उडविला. यावेळी पारडे पुन्हा विंडीजच्या बाजूने झुकले. परंतु, जडेजा व शार्दुल यांनी केवळ २.३ षटकांत ३० धावांची अविभक्त भागीदारी करत भारतीय संघ विजयाच्या दारातून परत जाणार नाही याची दक्षता घेतली.

विंडीजकडून किमो पॉलने ३ तर शेल्डन कॉटरेल, अल्झारी जोसेफ आणि जेसन होल्डर यांनी प्रत्येकी १ बळी घेतला. तत्पूर्वी, निकोलस पूरन आणि कर्णधार कायरन पोलार्डने केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर, वेस्ट इंडीजने ३१५ धावांपर्यंत मजल मारली.
भारताकडून पदार्पण करणार्‍या नवदीप सैनीने २ तर रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर आणि मोहम्मद शमीने १ बळी घेतला.

धावफलक
वेस्ट इंडीज ः इविन लुईस झे. सैनी गो. जडेजा २१, शेय होप त्रि. गो. शमी ४२, रॉस्टन चेज त्रि. गो. सैनी ३८, शिमरॉन हेटमायर झे. कुलदीप गो. सैनी ३७, निकोलस पूरन झे. जडेजा गो. ठाकूर ८९ (६४ चेंडू, १० चौकार, ३ षटकार), कायरन पोलार्ड नाबाद ७४ (५१ चेंडू, ३ चौकार, ७ षटकार), जेसन होल्डर नाबाद ७, अवांतर ७, एकूण ५० षटकांत ८ बाद ३१५
गोलंदाजी ः शार्दुल ठाकूर १०-०-६६-१, मोहम्मद शमी १०-२-६६-१, नवदीप सैनी १०-०-५८-२, कुलदीप यादव १०-०-६७-०, रवींद्र जडेजा १०-०-५४-१
भारत ः रोहित शर्मा झे. होप गो. होल्डर ६३ (६३ चेंडू, ८ चौकार, १ षटकार), लोकेश राहुल झे. होप गो. जोसेफ ७७ (८९ चेंडू, ८ चौकार, १ षटकार), विराट कोहली त्रि. गो. पॉल ८५ (८१ चेंडू, ९ चौकार), श्रेयस अय्यर झे. जोसेफ गो. पॉल ७, ऋषभ पंत त्रि. गो. पॉल ७, केदार जाधव त्रि. गो. कॉटरेल ९, रवींद्र जडेजा नाबाद ३९ (३१ चेंडू, ४ चौकार), शार्दुल ठाकूर नाबाद १७ (६ चेंडू, २ चौकार, १ षटकार), अवांतर १२, एकूण ४८.४ षटकांत ६ बाद ३१६
गोलंदाजी ः शेल्डन कॉटरेल १०-१-७४-१, जेसन होल्डर १०-०-६३-१, किमो पॉल ९.४-०-५९-३, रॉस्टन चेज ४-०-१९-०, खारी पिएर ७-०-४६-०, अल्झारी जोसेफ ८-०-५३-१

विराटने टाकले कॅलिसला मागे
टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याने काल रविवारी आपल्या वनडे कारकिर्दीतील ५५वे अर्धशतक ठोकताना या खेळी दरम्यान वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणार्‍यांच्या यादीत सातव्या स्थानावर असलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या जॅक कॅलिसला आठव्या स्थानी ढकलत सातव्या स्थानावर हक्क सांगितला. कॅलिसच्या नावावर ३२८ सामन्यांत ११५७९ धावा आहेत. कोहलीने २४२ सामन्यांत आपल्या नावावर ११६०९ घावा जमा केल्या आहेत. इंझमाम उल हक (११७३९) याचा विक्रम विराटच्या दृष्टीपथात आहे. सलग चौथ्या वर्षी कॅलेंडर वर्षांत आंतरराष्ट्रीय सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम कोहलीने केला. कोहलीने यावर्षी ४४ सामने खेळताना ६४.६०च्या सरासरीने २४५५ धावा कुटल्या. २०१६ (२५९५), २०१७ (२८१८) व २०१८ (७३५) या कॅलेंडर वर्षांतही कोहली सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला होता.

शेय होप दुसरा फास्टेस्ट तीन हजारी
वनडे क्रिकेटमध्ये सर्वांत कमी डावांत ३ हजार धावा करणारा विंडीजचा शेय होप हा दुसरा फलंदाज ठरला आहे. होपने केवळ ६७ डावांत तीन हजार धावांचा टप्पा ओलांडला. दक्षिण आफ्रिकेच्या हाशिम आमलाला यासाठी केवळ ५७ डाव लागले होते. ६८ डावांसह पाकिस्तानचा बाबर आझम तिसर्‍या तर विंडीजचे दिग्गज व्हिव रिचडर्‌‌स ६९ डावांसह या यादीत चौथ्या स्थानी आहेत.