भाभासुमंच राजकीय पक्ष स्थापण्यावर ठाम

0
50

मगो नेते तथा सार्वजनिक बांधकाममंत्री सुदिन ढवळीकर यांनी भारतीय भाषा सुरक्षा मंचला नवा पक्ष स्थापन करण्याच्या प्रस्तावावर फेरविचार करण्याचे आवाहन केले असले तरी भाभासुमंने पक्षाच्या नावासह पक्ष स्थापनेचे सर्व सोपस्कार पूर्ण केले आहेत. पुढील दोन-तीन दिवसांत निवडणूक आयोगासमोर पक्षाच्या नोंदणीसाठीचा अर्ज सादर करणार असल्याचे मंचच्या राजकीय विभागाचे प्रमुख ऍड्. उदय भेंब्रे यांनी काल सांगितले.

निवडणूक आयोगासमोर अर्ज सादर केल्यानंतर नोंदणी होण्यासाठी किमान दोन महिने लागतात. प्रस्तावात त्रुटी दिसून आल्यास त्या दुरुस्त कराव्या लागतात. त्यामुळे अर्जात कोणत्याही त्रुटी राहू नयेत, अशी काळजी घेतल्याचे भेंब्रे यांनी सांगितले. मगोने भाजपची साथ सोडण्याचे अद्याप आश्‍वासन न दिल्यानेच नवा पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील काळातील राजकीय घडामोडींवर बरेच काही अवलंबून आहे, असे ते म्हणाले. भाजपच्या पराभवासाठी मंचने आतापासूनच काम सुरू केल्याचे त्यांनी सांगितले.