दहा दहशतवाद्यांचा उरीत खात्मा

0
57

>> घुसखोरीचा प्रयत्न जवानांनी हाणून पाडला

 

पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन करीत सीमारेषेवर केलेल्या गोळीबारावेळी घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या १० दहशतवाद्यांचा भारतीय जवानांनी खात्मा केला. चकमकीवेळी १ जवान शहीद झाला आहे. उरी सेक्टरमधील लछीपुरा परिसरात लष्कराने ही कारवाई केली.
घुसखोरी करण्याचा दहशतवाद्यांचा हा मोठा प्रयत्न होता असे लष्कराच्या सूत्रांनी सांगितले. काल दुपारी पाकिस्तानने लछीपुरा सीमारेषेवर भारतीय सैन्यावर गोळीबार केला. पाकिस्तानच्या गोळीबाराला भारतीय जवानांनी सडेतोड प्रत्युत्तर देत गोळीबार केला. यावेळी दोन्ही बाजूंकडून जोरदार गोळीबार झाला. या धुमश्‍चक्रीचा फायदा घेत लछीपुरा परिसरात सुमारे १५ दहशतवादी भारतीय हद्दीत घुसण्याच्या तयारीत होते. त्यावेळी भारतीय जवानांनी केलेल्या गोळीबारात १० जण ठार झाले. अद्याप ५ जण या परिसरात लपून बसले आहेत. त्यांचा शोध घेण्यात येत असून सैन्याची कारवाई सुरूच असून दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
उरीमध्ये दोन दिवसांपूर्वी सैन्याच्या मुख्यालयावर चार दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात १८ जवान शहीद झाले होते.