‘भाभासुमं’च्या पक्षाचे नाव ‘गोवा सुरक्षा मंच’

0
76

भारतीय भाषा सुरक्षा मंचाने प्रादेशिक पक्ष स्थापनेची सर्व तयारी पूर्ण केली असून त्यासाठी ‘गोवा सुरक्षा मंच’ या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. मगो पक्ष भारतीय जनता पक्षाशी असलेली युती तोडण्यास तयार नसल्याने राज्यातील पस्तीस मतदारसंघांमध्ये स्वतःचे उमेदवार उभे करण्याची घोषणा पक्षातर्फे यापूर्वी करण्यात आलेली असली, तरी मगोशी हातमिळवणी करण्याचे प्रयत्न अद्याप सुरू आहेत.

मातृभाषांतून प्राथमिक शिक्षण या मुद्द्यावरून या राजकीय पर्यायाची कल्पना पुढे आली असली तरी आता गोव्याशी निगडित सर्व प्रश्न हाती घेण्याचे भारतीय भाषा सुरक्षा मंचाच्या राजकीय आघाडीने ठरवले आहे. त्यामुळेच पक्षाचे नाव ‘गोवा सुरक्षा मंच’ असे ठेवण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
मगो आणि भाजपा यांच्यातील युतीसंदर्भातील बोलणी लांबणीवर पडली असून त्यामुळे भाभासुमंही येत्या दोन ऑक्टोबरला केवळ पक्षाचे नाव घोषित करील आणि उमेदवार निवडीची प्रक्रिया सुरू करील असे सांगण्यात येत आहे. डिसेंबरपर्यंतच्या घडामोडींतूनच नेमके राजकीय चित्र स्पष्ट होऊ शकेल असे राजकीय निरीक्षकाना वाटते.