मगोशी युती राहणारच ः गडकरी

0
79

>> क्रूझ टर्मिनस उभारणार

मगो-भाजप युतीमुळे दोन्ही पक्षांचे भले होईल. राजकीय पक्ष म्हटल्यानंतर वाटाघाटी असतातच, असे सांगून मगो बरोबर युती राहणारच असा दृढ विश्‍वास भाजपचे गोवा प्रभारी तथा केंद्रीय भूपृष्ठ व जहाजोद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.

मगोचे ज्येष्ठ नेते व साबांखा मंत्री सुदिन ढवळीकर यांच्याशी आपले सलोख्याचे संबंध आहे. त्यांचे प्रत्येक काम आपण करतो. युती प्रश्‍नावर लवकरच आपण मगो नेत्यांकडे बैठक घेऊन चर्चा करणार असल्याचे श्री. गडकरी यांनी स्पष्ट केले.
आपचा भाजपला फायदा  
आगामी निवडणुकीत भाजपला सर्वात जास्त ङ्गायदा आम आदमी पक्षाचा होईल. महात्मा गांधींचे कॉंग्रेसमुक्त भारत करण्याचे स्वप्न होते. कॉंग्रेसमधील अंतर्गत मतभेद व आपचे सहकार्य यामुळे बापूजींचे स्वप्न पूर्ण होईल असे गडकरी यांनी सांगितले.
संघ भाजप बरोबरच
संघातही कोणत्याही धोरणावर मतभेद असतात असे असले तरी स्वयंसेवक संघटना तोडून कुठेही जात नसतात. संघाची विचारधाराच तशी आहे. त्यामुळे परिवारातील मतभेदांचा निवडणुकीच्यावेळी भाजपवर काहीही परिणाम होणार नाही, असे गडकरी यांनी एका प्रश्‍नावर सांगितले. परिवारातील मतभेद सामोपचाराने सोडविण्याचे प्रयत्न चालू असून ते सोडविण्यास यश येईल, असे गडकरी यांनी सांगितले.
कॉंग्रेस नेते संपर्कात
कॉंग्रेस पक्षाची स्थिती बिकट बनली आहे. त्यामुळे अनेकजणांनी भाजप प्रवेशासाठी आपल्याकडे संपर्क केल्याचे गडकरी यांनी सांगितले. कॉंग्रेस नेतेच आता कॉंग्रेसमुक्त गोवा करण्याच्या कामास लागले आहे, असे ते म्हणाले.
क्रूझ टर्मिनस उभारणार
पर्यटन हा गोव्याचा महत्त्वाचा व्यवसाय बनला आहे. राज्यात रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी क्रूझ टर्मिनसफ उभारण्यात येणार असून या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विदेशी पर्यटक गोव्यात येणार असल्याचे केंद्रीय जहाजोद्योगमंत्री गडकरी यांनी सांगितले. मुरगाव बंदर विकसित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. १ लाख ८५ हजार टनाचे जहाज बंदरावर येऊ शकेल, अशी यंत्रणा उभारण्यासाठी १२ कोटी रुपयांची तरतूद केल्याची माहिती त्यांनी दिली. क्रुझ उद्योगात गोव्यातील उद्योजकांना गुंतवणूक करण्याचे आवाहन त्यांनी केले.
जुवारी पुलाच्या प्रकल्पात आपण स्वतः लक्ष केंद्रित केले असून हा पूल जगाचे आकर्षण ठरेल, असे सांगून पर्यटनासाठी सर्व सुविधा या प्रकल्पात असतील, असे त्यांनी सांगितले. साडेतीन हजार कोटींचा हा प्रकल्प आहे. भविष्यकाळात पाण्यात उतरणारी सी प्लेन सुविधाही उपलब्ध होईल. पर्यटनाच्या दृष्टीकोनातून गोव्याची जगभरात प्रसिद्धी करण्यासाठी केंद्र सरकार मदत करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
खारीवाडा येथे मच्छीमारी बंदर उभारण्यात येणार असून यापुढे ट्रॉलरना १२ नॉटीकल मैल अंतरावर मच्छीमारी करता येईल. त्यामुळे सागरी अन्न प्रक्रिया प्रकल्पही उभारण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. सॅटकाईट बंदरासाठी शेजारच्या महाराष्ट्र व कर्नाटक राज्यात जागा शोधून ठेवल्या आहेत. बेतूल येथे हा प्रकल्प उभारण्यासाठी प्राधान्य दिले होते. त्याबाबत निर्णय घेण्याचे अधिकार राज्य सरकारला आहे, असे त्यांनी सांगितले.

विकासाचा मुद्दा घेऊन
जनतेसमोर जाणार
विकास ही भाजपची भूमिका आहे. केंद्रातील सरकारच्या अडीच व राज्यातील साडेचार वर्षांच्या काळात गोव्यात झालेला विकास यापूर्वी कधीच झाला नव्हता. येत्या विधानसभा निवडणुकीत भाजप विकासाचा मुद्दा घेऊन जनतेसमोर जाणार असल्यचे श्री. गडकरी यांनी सांगितले. गेल्या वेळी २१ जागा मिळाल्या होत्या. आता किमान २५ जागा मिळतील, अशा पद्धतीने काम करण्याची सूचना आपण पक्षाच्या कार्यकर्त्यांना केल्याचे त्यांनी सांगितले. निवडणुकीच्यावेळी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यासह सर्वच केंद्रीय नेते प्रचारासाठी गोव्यात येणार आहेत, असे गडकरी यांनी सांगितले. निवडणुकीपूर्वी अनेक प्रकल्पांचे भूमीपूजन होईल, अशीही माहिती त्यांनी दिली. केंद्राच्या वेगवेगळ्या योजना गोव्याला मिळवून देण्यासाठी प्रयत्नरत असून त्यासाठी समन्वयक म्हणून दक्षिण गोव्याचे खासदार ऍड. नरेंद्र सावईकर यांना जबाबदारी दिल्याचे त्यांनी सांगितले.