भाडेकरूंची माहिती 48 तासांत द्यावी लागणार!

0
6

सुधारित नियमांचा मसुदा 30 दिवस सूचना व हरकतींसाठी खुला

राज्य सरकारने भाडेकरू पडताळणी प्रक्रियेला गती देण्यासाठी भाडेकरू पडताळणीचे सुधारित नियम तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारने सुधारित नियमांचा मसुदा जारी केला असून, या मसुद्यानुसार घरमालकांना भाडेकरूंची सविस्तर माहिती 48 तासांच्या आत विहित नमुन्यात संबंधित पोलीस स्थानकात सादर करावी लागणार आहे.

राज्य सरकारने गोवा (भाडेकरू पडताळणी) कायदा, 2024 अंतर्गत गोवा (भाडेकरू पडताळणी) नियम, 2025 ची मसुदा सूचना जारी केली आहे. या मसुदा सूचनेनुसार घरमालकांना त्यांच्या भाडेकरूंची सविस्तर माहिती 48 तासांच्या आत विहित नमुन्यात स्थानिक पोलिसांना सादर करावी लागणार आहे. तसेच, घरमालकाने एक नोंदणी पुस्तिका ठेवून त्यात भाडेकरूंची नोंद ठेवण्याची तरतूद करण्यात आली आहे. घरमालक डिजिटल पद्धतीने सुध्दा भाडेकरूंची माहिती संबंधित पोलीस स्थानकात सादर करू शकतात; पण त्यासाठी सरकारी नियमानुसार शुल्क भरावे लागणार आहे.

सुधारित नियमांमध्ये पोलीस अधिकाऱ्यांना भाडेकरूंच्या नोंदी तपासण्याचे, आयसीजेएस किंवा सीसीटीएनएस पोर्टलद्वारे माहिती पडताळण्याचे आणि खोटी किंवा लपवून ठेवलेल्या माहितीच्या बाबतीत उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना अहवाल सादर करण्याचे अधिकार देखील दिले आहेत.
घरमालकाने सूचनेचे पालन न केल्यास उपविभागीय दंडाधिकाऱ्यांकडून दंड आकारण्याची तरतूद करण्यात आली आहे. नागरिकांना या नियमांबाबत सूचना किंवा हरकती सादर करण्यासाठी 30 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. नागरिक आपल्या सूचना किंवा हरकती मुख्य सचिव किंवा सचिव (गृह) सचिवालय पर्वरी गोवा येथे सादर करू शकतात. हा मसुदा विचारात घेताना सूचना, आक्षेप विचारात घेतले जाणार आहेत, असे सूचनेत म्हटले आहे.