भाजपला संघाने सत्तेवर आणले तेव्हा आरोप झाला नाही

0
66

गोव्यात २०१२ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्यावेळी भाभासुमंच्या माध्यमातून संघाच्या स्वयंसेवकांनी कॉंग्रेस हटाव मोहीम सुरू करून भाजपला सत्तेवर आणले होते. त्यावेळी राजकारणात भाग घेतल्याचा आरोप संघातील कोणीही केला नव्हता. आता आपण निवडणूक लढविलेली नाही. नवा पक्ष स्थापन करण्याच्या निर्णयास पाठिंबा दिला आहे. त्यामुळे कोकण प्रांतातील संघाच्या पदाधिकार्‍यांनी आपल्या उचलबांगडीसाठी दिलेले कारण पटण्यासारखे नाही. जो राजकीय पक्ष जनतेला गृहीत धरतो तो पक्ष कॉंग्रेस असो, भाजप असो किंवा अन्य कोणताही पक्ष असो, त्याचा पराभव करण्यासाठी संघाचा स्वयंसेवक पुढे येऊ शकतो व त्यासाठी पुढे आले पाहिजे, असे वेलिंगकर यांनी सांगितले.

आता भाजपने समाजाची फसवणूक केली आहे. त्यामुळे भाजपला अद्दल घडविण्याचा निर्णय घेतल्याचे ते म्हणाले. आता आमचा कोणाशीही संबंध नाही. समाजाच्या हिताचा निर्णय घेण्यास आपण मुक्त आहे. निवडणुकीपर्यंत नागरपूरलाही काही कळविण्याची गरज नाही. निवडणुकीनंतर येथील कार्याची माहिती दिली जाईल, असे त्यांनी सांगितले. आपण सत्याच्या बाजूने असल्याने भीती नाही. तत्कालीन मुख्यमंत्री व विद्यमान संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी समाजाची फसवणूक केली आहे. त्यांच्यावर विश्‍वास ठेवणे शक्य नाही असे ते म्हणाले.