भारतीय जनता पक्षातर्फे येत्या 6 ते 14 एप्रिलदरम्यान ‘सामाजिक न्याय सप्ताह कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार असून, 6 एप्रिल रोजी भाजपच्या स्थापना दिनानिमित्त राज्यातील सुमारे 1 लाख घरांवर भाजपचा झेंडा फडकविण्यात येणार आहे, अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी भाजपच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या येथील आयएमबी सभागृहात पार पडलेल्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत
काल दिली.
राज्यातील भाजपच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, राज्य मंत्रिमंडळातील मंत्री, आमदार, राज्य कार्यकारी समितीचे पदाधिकारी व इतरांनी हजेरी लावली.
सामाजिक न्याय सप्ताह कार्यक्रमाची सुरुवात भाजपच्या स्थापना दिनी करण्यात येणार आहे. स्थापना दिनी भाजपच्या 463 शक्ती केंद्रांवर भाजपचा झेंडा फडकविण्यात येणार आहे. तसेच, सुमारे 1 लाख घरांवर भाजपचा झेंडा फडकविण्याचे ठरविण्यात आले आहे. सामाजिक न्याय सप्ताहानिमित्त जोतिबा फुले जयंती, आंबेडकर जयंती, रक्तदान शिबिर, स्वच्छता अभियान आदी कार्यक्रम राबविण्यात येणार आहे, असे तानावडे यांनी सांगितले.