भाजपच्या नूतन प्रदेशाध्यक्षांची निवड आगामी तीन महिन्यांत

0
109

>> विनय तेंडुलकर यांची माहिती

भाजपच्या नवीन प्रदेशाध्यक्षांची निवड आगामी तीन महिन्यात केली जाणार आहे, अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर यांनी पत्रकारांशी बोलताना काल दिली.

देशभरात भाजपची संघटनात्मक निवडणूक घेतली जाणार आहे. येत्या १३ जून रोजी नवी दिल्ली येथे होणार्‍या बैठकीत संघटनात्मक निवडणुकीवर चर्चा करून निर्णय घेतला जाणार आहे. संघटनात्मक निवडणुकीपूर्वी भाजपची सदस्य नोंदणी मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यानंतर मतदान केंद्र समिती, मंडळ समिती, जिल्हा समित्यांची निवड केल्यानंतर राज्य समितीची निवड केली जाणार आहे, असेही तेंडुलकर यांनी सांगितले.

भाजपने राज्यात ४ लाख १९ हजार सदस्यांची नोंदणी यापूर्वी केली होती. आता, पूर्वीच्या पेक्षा जास्त सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट ठेवले जाणार आहे. साधारण ५० टक्के मंडळ समित्यांची निवड केल्यानंतर जिल्हा व राज्य समितीची निवड केली जाऊ शकते. आगामी दोन ते तीन महिन्यात निवडणूक प्रक्रिया पूर्ण करून नवीन अध्यक्षांची निवड केली जाऊ शकते. भाजपच्या निष्ठावंत, प्रामाणिक कार्यकर्त्याची प्रदेशाध्यक्षपदी निवड केली जाणार आहे, असेही तेंडुलकर यांनी सांगितले. आपल्या प्रदेशाध्यक्षपदाचा सहा वर्षांच्या कारकिर्दीत भाजपने राजकीय पातळीवर चांगले यश संपादन केल्याचा दावा तेंडुलकर यांनी केला.