भाजपचे नेते डॉ. हर्षवर्धन यांची राजकारणातून निवृत्ती

0
3

दिल्लीमधील चांदणी चौकचे खासदार आणि भाजपचे वरिष्ठ नेते डॉ. हर्षवर्धन यांनी राजकारणाला राम राम ठोकून निवृत्ती जाहीर केली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने त्यांना उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांनी हा निर्णय जाहीर केला. शनिवारी भाजपने दिल्लीतील पाच लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. यामध्ये चांदणी चौक येथून प्रवीण खंडेलवाल यांना उमेदवारी दिली. डॉ. हर्षवर्धन हे याच मतदारसंघातून पाच वेळा आमदार आणि दोन वेळा खासदार राहिले आहेत. त्यांनी केंद्रीय आरोग्य आणि पर्यावरणमंत्री म्हणून काम केले होते. डॉ. हर्षवर्धन यांनी या निर्णयाची माहिती दिली. तसेच राजकारणातून बाजूला झाल्यानंतर पूर्व दिल्लीच्या कृष्णानगर भागात असलेल्या आपल्या दवाखान्यावर लक्ष देणार असल्याचे जाहीर केले.
डॉ. हर्षवर्धन यांच्या ऐवजी ज्यांना उमेदवारी दिली, ते प्रवीण खंडेलवाल हे व्यावसायिक असून ते अखिल भारतीय व्यापारी महासंघाचे सरचिटणीस आहेत. खंडेलवाल यांनी जीएसटी परिषदेतही काम केलेले आहे.